जामखेड न्युज – – –
कर्जत नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यासह महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे तसेच गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल हे देखील उपस्थित होते.
नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित सभेत बोलत असताना आमदार रोहित पवार यांनी भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांना थेट आव्हान दिलं आहे. विकासाच्या मुद्यावरून बोलत असताना राम शिंदे कायम २ वर्षात काय केलं असे विचारत असतात, तर या सभेच्या माध्यमातून त्यांना समोरासमोर येण्याचं आवाहन देत विकासाच्या मुद्द्यावरून समोरासमोर या मग दाखवतो, असं आमदार रोहित पवार यांनी बोलताना म्हटलं आहे.
दरम्यान, नगर पंचायत निवडणुकीमुळे सध्या कर्जतचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांना थेट आव्हान दिल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. येत्या 21 तारखेला नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे तसेच 22 तारखेला मतमोजणी होणार आहे. त्यानंतर जनतेचा कौल नेमका कोणाच्या पारड्यात पडणार हे चित्र स्पष्ट होईल.





