जामखेड न्युज – – –
जम्मू-काश्मीरमधल्या श्रीनगर इथं पोलिसांच्या बसवर मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात 14 पोलीस जखमी झाले असून दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. अजूनही 3 पोलीस गंभीर आहेत. सशस्त्र पोलीस दलाच्या 9 व्या बटालियनवर हा हल्ला करण्यात आला आहे.
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारा घटनेतील अनुच्छेद 370 रद्द केल्यानंतरचा हा पहिला मोठा दहशतवादी हल्ला आहे. जम्मू-काश्मीर पोलीस सशस्त्र दलाच्या पोलिसांना घेऊन जाणाऱ्या बसला दहशतवाद्यांनी श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर लक्ष्य केले. दहशतवाद्यांनी पोलिसांच्या बसवर अंधाधुंद गोळीबार केला. त्यात दोन पोलीस शहीद झाले.
शहीद झालेल्या पोलिसांमध्ये एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि एक शिपाई असल्याची माहिती पोलिसांनी ट्वीट संदेशाद्वारे दिली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले अनेक पोलीस अत्यवस्थ आहेत. श्रीनगर इथून बस पोलीस हेडक्वार्टरला जात असताना दहशतवाद्यांनी बसवर बेछुट गोळीबार केला. या हल्ल्यात 14 पोलीस जखमी झाले आहेत. सर्व जखमी पोलिसांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान या गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात नाकेबंदी करण्यात आली असून दहशतवाद्यांना अटक करण्यासाठी तपासणी सुरु करण्यात आली आहे. श्रीनगरचे उपनगर असलेल्या झेवान भागात पोलीस आणि निमलष्करी दलांचे जवान मोठ्या प्रमाणावर तैनात आहेत. याच पोलिसांच्या सशस्त्र दलाचा तळ आहे. त्याचबरोबर केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि भारत-तिबेट सीमा पोलीस दलाच्या (आयटीबीपी) छावण्याही याच भागात आहेत. तरीही दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. हे आत्मघाती दहशतवादी असावेत असा अंदाज आहे.
या दहशतवादी हल्ल्यापूर्वी आज श्रीनगरच्या बाहेरील दुसऱ्या एका घटनेत सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरच्या बाहेरील भागात सोमवारी सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना चकमकीत ठार केले. रंगरेथ भागात ही चकमक झाल्याचे पोलिसांनी सांगितले. काश्मीर झोन पोलिसांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.