जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर महापुरुषांच्या परिवर्तनवादी विचाराने मला लढण्याचे बळ दिले. त्यामुळे आयुष्यात कितीही संकटे आली तरी सतत लढत राहील, माघार घेणार नाही असे प्रतिपादन ग्रामीण विकास केंद्राचे संस्थापक अध्यक्ष ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी केले.
मराठवाडा लोकविकास मंचच्या वतीने कळंब येथील पर्याय या सामाजिक संस्थेच्या सभागृहात आयोजित सामाजिक कार्य गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते. मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
ए. एम. कोंडळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास मराठवाडा लोकविकास मंचचे अध्यक्ष विश्वनाथ आण्णा तोडकर, उपाध्यक्ष भूमिपुत्र वाघ, रमेश भिसे, रमाकांत कुलकर्णी, मंगलताई दैठणकर, प्रमोद झिंजाडे, कालिंदिताई पाटील, दत्ताभाऊ बारगजे आदी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना ॲड. डॉ. अरुण जाधव म्हणाले, आज मला मराठवाडा विकास मंचच्या वतीने दिलेला पुरस्कार हा माझ्या २० वर्षाच्या सामाजिक कार्याचा गौरव आहे. हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून माझ्यासोबत काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे. या पुरस्काराने मला सामाजिक क्षेत्रात पुन्हा नव्या जोमाने काम करण्याची प्रेरणा व प्रोत्साहन मिळाले. कोल्हाटी समाजातील एका नर्तिकेचा मी मुलगा. सामाजिक चळवळीमुळे मी घडलो. मिळेल त्या साधन सामुग्रीच्या साहाय्याने भटक्या-विमुक्तांच्या विविध प्रश्न सोडवण्यासाठी मी लढत आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी लढत राहणार असे ते म्हणाले.
यावेळी विश्वास तोडकर, रमाकांत कुलकर्णी, मंगलाताई दैठणकर, प्रमोद झिंजाडे, दत्ताभाऊ बारगजे, ए. एन. कोंढाळकर यांचीही भाषणे झाली. महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन व दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. शाहीर अरविंद घोगरे आणि सहकाऱ्यांनी शाहिरी जलसा सादर केला. भूमिपुत्र वाघ यांनी प्रास्ताविक केले. भैरवनाथ कानडे यांनी सूत्रसंचालन केले. ओमप्रकाश गिरी यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास ग्रामीण विकास केंद्राचे संचालक बापू ओहोळ, प्रसिद्धीप्रमुख भगवान राऊत, प्रकल्प समन्वयक सचिन भिंगारदिवे, सागर भांगरे, संतोष चव्हाण, मच्छिंद्र जाधव, विशाल जाधव, राकेश साळवे, वैशाली मुरूमकर, विशाल पवार, दिपक माळी, दादा पाटील दाताळ, आबा कराळे, रोहित पवार व प्रशिक्षणार्थी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.