कांद्याच्या 24 पिशव्यांना मिळाले 13 रुपये

0
295
जामखेड न्युज – – – 
24 पिशव्यांचे मिळाले 13 रूपये एका शेतकऱ्याने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 1 डिसेंबर रोजी कांदा आणला होता. 24 पिशव्या कांद्याचे वजन अकराशे किलो भरले. त्यातून आठ ते दहा हजार रुपये मिळतील, अशी शेतकऱ्याला आशा होती. मात्र, हमाली, तोलाई, मोटार भाडे वजा होऊन त्या शेतकऱ्याच्या हाती केवळ 13 रुपये पडले.
    दोन वर्षांपासून कोरोनाशी मुकाबला करतानाच मागील काही महिन्यांपासून अवकाळीचे संकट सुरू आहे. नैसर्गिक संकटातून बाहेर पडत असतानाच आता नवीन कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने आता ‘जगावे की मरावे’ हा प्रश्‍न बळिराजाला पडला आहे.
बहुतेक शेतकऱ्यांनी चांगला दर येईल या हेतूने यंदा कांदा (Onion) लागवड केली आहे. आता बाजारात नवीन कांद्याची आवक वाढू लागली आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाऊस सुरू होण्यापूर्वी दररोज सरासरी 150 गाड्यांची आवक होती. मात्र, मागील काही दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने सध्या 40 ते 55 गाड्यांपर्यंतच आवक येऊ लागली आहे. बाजार समितीत कांद्याची आवक कमी झाल्यानंतरही दर वधारलेला नाही. यंदा पावसाळ्यात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली होती. अवकाळीनेही अनेकदा दणका दिला आहे. त्यामुळे हजारो हेक्‍टरवरील कांद्याचे नुकसान झाले असून काही जिल्ह्यांमध्ये विलंबाने लागवड झाली आहे. त्यामुळे नव्या कांद्याची आवक बाजारात वाढू लागली आहे. दुसरीकडे, जुन्या कांद्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र, नव्या कांद्याच्या तुलनेत जुन्या कांद्यालाच मागणी अधिक असून त्याचा दरही अधिक आहे.
आंध्र प्रदेशात पाऊस असल्याने त्या ठिकाणाहून अजून व्यापारी आले नसल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. बाजारात व्यापाऱ्यांची संख्या कमी असल्याने मालाला उठाव नसून, दरही कमी मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु, काही दिवसांत कांद्याचे दर वाढतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here