जामखेड न्युज – – – –
मराठा आरक्षणाबाबत खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी पुन्हा सरकारला वेळ दिला असून त्यांच्या मागण्यांवर विचार न केल्यास पुणे ते मुंबई लॉंग मार्च काढणार असल्याचा इशारा दिला आहे. ते, पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तसेच, औरंगाबादला संभाजी नगर नाव द्यायला काहीच हरकत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
छत्रपती संभाजी राजे भोसले म्हणाले की, “आरक्षणाचा विषय हा लगेच होणारा नाही. त्याला सहा महिने किंवा वर्ष लागेल. राज्य सरकारची जबाबदारी आहे की मागासवर्गीय आयोग स्थापन करून किंबहुना आयोग स्थापन करता येत नसेल तर अगोदर कमिटी स्थापन करावी. त्याच सर्वेक्षण करा.”
ADVERTISEMENT

खासदार संभाजी राजे पुढे म्हणाले की, तुम्ही स्वतः सामाजिक मागास राहिलेले नाहीत. सामाजिक मागास सिद्ध करण्यासाठी हे पहिलं नियोजन आहे. पुढे काहीच होत नसेल तर केंद्रात जाऊ शकतो. पाच मूलभूत सुविधा समाजाला देऊ शकता. हीच मागणी मी केलेली आहे. यावर काही निर्णय झालेला नाही. यामुळे पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याच मी ठरवलेलं आहे. परत, मी थोडा वेळ देत आहे. जर यात देखील काही निर्णय घेतला नाही. तर दुसरा पर्याय राहणार नाही. पुण्यातून मुंबईत लाँग मार्च काढणार अस खासदार संभाजी राजे यांनी म्हटलं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा फार नाजूक विषय आहे. सरकारने इतर काम बाजूला ठेऊन एसटीच्या संदर्भात निर्णय घ्यायला हवा. त्यांच्यासोबत चर्चा केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाची भेट घ्यावी. किती दिवस ते आझाद मैदानावर बसणार आहेत. यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सरकारने बाकीचे काम बंद करून ताबडतोब बैठक बोलवावी आणि मार्ग काढावा. एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, अस देखील संभाजी राजे भोसले म्हणाले आहेत.