जामखेड प्रतिनिधी
तालुक्यातील सर्वात मोठी खर्डा ग्रामपंचायत निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार व माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी प्रतिष्ठेची केली होती. दोघांनीही प्रचाराचा शुभारंभ खर्डा येथे केला होता. या ग्रामपंचायतमध्ये भाजपाची सत्ता होती. राष्ट्रवादी काँग्रेसने विजयसिंह गोलेकर यांच्या नेतृत्वाखाली पॅनल उभा केला व 17 पैकी 11 जागा जिंकून भाजपाला धोबीपछाड देत सत्ता मिळवली. पण एका प्रभागात नोटा’ला सर्व उमेदवारापेक्षा जास्त मते मिळाली त्यामुळे दोन नंबर उमेदवार विजयी घोषित केले. याची जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे.
तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रभाग क्रमांक पाचमध्ये वेगळी लढत पाहायला मिळाली. निवडणुकीत मतदारांनी नोटा बटणालाच अधिक पसंती दिली. उमेदवार शीतल सुग्रीव भोसले यांना 396 मतं मिळाली. तर ‘नोटा’ ला चक्क 502 मतं पडली. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ज्या ठिकाणी उमेदवारांपेक्षा ‘नोटा’ला अधिक मतं असतात, त्या ठिकाणी ‘नोटा’नंतर सर्वाधिक मतं मिळवणारा उमेदवार विजयी घोषित केला जातो. त्यानुसार दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवार शीतल भोसले खर्डा ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रभाग क्रमांक पाचमध्ये विजयी झाल्या. निवडणूक निर्णय अधिकारी देविदास घोडेचोर यांनी ही माहिती दिली.