Tuesday, March 3, 2026
Home ताज्या बातम्या जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जोरावर अक्षय लेकुरवाळे बनला सीए जामखेड तालुक्यातील...

जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जोरावर अक्षय लेकुरवाळे बनला सीए जामखेड तालुक्यातील तरूणाचा प्रेरणादायी प्रवास

0
2

जामखेड न्युज—–

जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जोरावर अक्षय लेकुरवाळे बनला सीए

जामखेड तालुक्यातील तरूणाचा प्रेरणादायी प्रवास

अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून अक्षय लेकुरवाळे यांनी यशस्वी झेप घेत आईवडिलांच्या कष्टाचे पांग फेडत जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांचा प्रेरणादायी प्रवास तरूणांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

जामखेड तालुक्यातील जवळा येथील शेतकरी अरुण लेकुरवाळे यांचे सुपुत्र अक्षय अरुण लेकुरवाळे यांनी ‘चार्टर्ड अकाउंटंट’ (सीए) या देशातील अत्यंत कठीण आणि प्रतिष्ठेच्या परीक्षेत यश संपादन करत आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचा पांग फेडला आहे. जानेवारी २०२६ मध्ये जाहीर झालेल्या सीए फायनलच्या निकालात त्यांनी घवघवीत यश मिळवत गावासह संपूर्ण परिसराचा मान उंचावला आहे.

अत्यंत साध्या आणि आर्थिकदृष्ट्या मर्यादित परिस्थितीत वाढलेल्या अक्षय यांचे प्राथमिक शिक्षण जवळा येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी रयत शिक्षण संस्थाच्या छत्रपती शिवाजी विद्यालयात माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. दहावीपर्यंतचे शिक्षण सातारा येथील महाराज सयाजीराव विद्यालयात घेतल्यानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी अहिल्यानगर येथील रेसिडेन्शिअल महाविद्यालयात प्रवेश घेतला.

बारावीनंतरच सीए होण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी पुण्यात जाऊन कठोर परिश्रमांची पराकाष्ठा केली. अभ्यासादरम्यान त्यांनी सी. व्ही. चितळे यांच्याकडे तीन वर्षांची आर्टिकलशिप (इंटर्नशिप) पूर्ण केली. सीए ही परीक्षा अत्यंत कठीण मानली जाते; अनेकदा अपयशाचा सामना करावा लागतो.

अक्षय यांच्या वाट्यालाही अनेक अपयश आले, परंतु त्यांनी खचून न जाता अधिक जिद्दीने अभ्यास सुरू ठेवला आणि अखेर यशाचे शिखर गाठले.

शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या वडिलांनी घेतलेले कष्ट, आईने दिलेला आधार आणि कुटुंबीयांचे प्रोत्साहन हेच आपल्या यशामागचे खरे बळ असल्याचे अक्षय यांनी नमूद केले. “वडिलांच्या घामाचे चीज करायचे, हीच माझी प्रेरणा होती,” अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

आपल्या समाजातील विद्यार्थ्यांनीही सीए सारख्या व्यावसायिक आणि आव्हानात्मक क्षेत्राकडे वळावे, असे आवाहन अक्षय यांनी केले.

त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. शेतकऱ्याच्या मुलाने जिद्द, चिकाटी आणि कष्टांच्या बळावर गाठलेले हे यश निश्चितच ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!