जामखेड न्युज – – –
राज्यात पुन्हा पावसाची शक्यता आहे. गेले तीन दिवस अनेक ठिकाणी जोरदार आणि मध्यम पाऊस झाला आहे. कोकणात दोन दिवस चांगला पाऊस झाला. दरम्यान, आणखी तीन दिवस पावसाळी वातावरण असणार आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्टा निर्माण झाल्याने पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता असून पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये आणखी तीन दिवस पावसाळी वातावरण राहणार आहे. गेल्या 24 तासांत मध्य महाराष्ट्र बहुतांश ठिकाणी, तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.
23 नोव्हेंबरनंतर या भागात हवामान कोरडे होणार आहे. विदर्भात पुढील तीन ते चार दिवस पावसाळी वातावरण कायम राहणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर भागांत पावसाळी वातावरण राहणार आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नगर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांत पुढील दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे.