जामखेड न्युज – – –
अजूनही मी मुख्यमंत्री आहे असंच मला वाटतंय असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणात फडणवीसांच्या या विधानाची खिल्ली उडवली. मी मुख्यमंत्री आहे असं मला कधीच वाटू नये. कारण हल्ली काही लोकांना मुख्यमंत्री असल्यासारखे वाटत आहे, असा चिमटा काढतानाच पुन्हा येईन म्हणणारे आता म्हणतायत मी गेलोच नाही, अशी घणाघाती टीका ठाकरे यांनी केली.
भाजपवर हल्ला
मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात करताच थेट भाजपवर हल्ला चढवला. अगदी पहिल्या वाक्यापासून ठाकरे यांनी भाजपची पिसे काढली. मला स्वत:ला मी मुख्यमंत्री आहे, असं कधीच वाटू नये. माझं तर सोडाच तर माझ्या तमाम जनतेला मी मुख्यमंत्री आहे असं कधीच वाटता कामा नये. मी घरातलाच आहे, मी तुमचा भाऊ आहे, असं वाटो, अशी ईश्वर चरणी प्रार्थना आहे. कारण काही जणांना असं वाटतं जे बोलत होते, पुन्हा येईल ते बोलत आहेत मी गेलोच नाही. बस आहे तिकडेच; पण जे संस्कार आणि संस्कृती असते ती हीच असते. पदं आणि सत्ता काय आहेत? पदं येतील जातील; पण कधीही अहमपणा कधी डोक्यात येऊ देऊ नको. ज्यादिवशी डोक्यात हवा जाईल, त्यादिवशी तू संपलास, अशी माझ्या वडील आणि आजोबांची शिकवण आहे, असं उद्धव म्हणाले
विरोधकांचे पूर्वज परग्रहावरून आले काय?
मोहन भागवत म्हणतात हिंदू म्हणून आपण एक आहोत. आपले पूर्वज एक होते. मला त्यांना विचारायचंय आपले पूर्वज एक आहेत, तर विरोधकांचे पूर्वज परग्रहाहून आले काय? लखीमपूरमधील शेतकरी परग्रहावरून आले का? आंदोलक शेतकरी कुठून आले? असा सवाल ठाकरे यांनी भागवतांना केला. मात्र, माझ्या म्हणण्याचा अर्थ समजून घ्या. तुमच्यावर टीका करतोय असं समजू नका, असंही त्यांनी सांगितलं.
हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा
खोडायचे अनेकांनी प्रयत्न केले. पाडण्याचेही प्रयत्न केले. पण, माझं आजही आव्हान आहे. पाडून दाखवा. पण त्यांना सरकार पाडता येत नाही, म्हणून छापा की काटा सुरू आहे. छापाकाटा टाकायचा आणि काटा काढायचा अशी खेळी सुरू आहे. पण, ही थेरं मी अधिक काळ चालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. हर हर महादेव काय असतं हे दिल्लीच्या तख्ताला दाखवण्याची वेळ येऊ नये. पण आलीच तर दाखवावीच लागेल, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला






