जामखेड न्युज – –
निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याने नेते रुसतात. समर्थक तोडफोड करतात, अशी अनेक उदाहरणे आहेत. निमंत्रण पत्रिकेत नाव असले तरी ते कितव्या क्रमांकावर आहे, हा विषयही राजकीय मान अपमानाचा बनतो. सिंधुदुर्ग विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव तिसर्या क्रमांकावर टाकण्यात आल्याने राणे रुसले आहेत. राजशिष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करीत शिवसेना-भाजपत चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.
काय आहे वादाचा मुद्दा?
चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेवरून केंद्रीय मंत्री नारायण राणे नाराज असल्याची चर्चा आहे. निमंत्रण पत्रिकेवर राणे यांचे नाव तीन नंबरला आहे. यामध्ये राजकारण झाल्याच्या राणे यांचा सूर आहे. यावरुनच शिवसेनेने राणे यांच्यावर निशाणा साधला. राजशिष्टाचाराप्रमाणे निमंत्रण पत्रिका तयार केली. तीन नंबरच्या स्थानावरून रणकंदन करतील तर त्याचं ते अज्ञान आहे. त्यांनी चांगला गुरू ठेवावा, चांगले मागदर्शन घ्यावं, असा निशाणा खासदार विनायक राऊत यांनी साधला आहे. या कार्यक्रम पत्रिकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. दुसर्या क्रमांकावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे तर तिसर्या क्रमांकावर राणे यांचं नाव आहे. चिपी विमानतळावरुन शिवसेना भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे. त्यात कार्यक्रमात पत्रिकेत राणे यांचे नाव तिसर्या क्रमांकावर असल्यानं राणे रुसल्याची चर्चा आहे.
राणे यांना राऊत यांचा खोचक सल्ला
केंद्र आणि राज्य सरकारच्या राजशिष्टाचारप्रमाणे कार्यक्रम होणार आहे. प्रत्येकाचे स्थान ठरलेले आहे. कुठे कोण आहे, तीन नंबरच्या स्थानावरून उहापोह करतील तर त्यांचं ते अज्ञान आहे. त्यांना नेमके कळत नाही, की शासनाचा प्रोटोकॉल काय आहे, त्यांनी चांगला गुरू करावा म्हणजे त्यांना चांगले मागदर्शन मिळेल, असा खोचक टोला राऊत यांनी राणे लगावला. या वेळी टर्मिनल बिल्डिंगचा लोकार्पण सोहळ्यावेळीसुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच प्रमुख होते, अशी आठवणही त्यांनी राणे यांना करून दिली. राजशिष्टाचारप्रमाणे ज्यांना ज्यांना बोलवणं आवश्यक आहे. त्या सर्वांना मान सन्मानाने बोलावण्याचे काम महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून होणार आहे. यात फार मोठा योगायोग नाही, इतर जे सांगत होते, आम्ही यांना बोलावणार नाही, त्यांना बोलावणार नाही, अशा कुत्सित भावनेतून हा कार्यक्रम नाही. ज्यांचा मान सन्मान आहे, त्यांचा मान महाराष्ट्र सरकार करणार आहे. विमानतळाचे श्रेय आम्हाला घ्यायचे नाही तर ते आमचे कर्तव्य आहे, असं सांगायला राऊत विसरले नाहीत.
राजकारण तापणार?
या आधी राणे यानी चिपीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आलेच पाहिजे असे काही नाही असे म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर हा प्रोटोकॉल म्हणजे राणेंसाठी चपराक असल्याचं मानलं जात आहे. राणे यांना जन आशीर्वाद यात्रे दरम्यान अटक करण्यात आली होती. त्यामुळे राणे समर्थक संतप्त झाले आहेत. त्यातच ऑक्टोबरमध्ये ठाकरे-राणे एकाच मंचावर येत असल्याने राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
प्रोटोकॉल काय सांगतो?
विमानतळाच्या मालकीवरून शिवसेना आणि राणेंमध्ये जुंपली आहे. राणेंनी हे विमानतळ केंद्र सरकारच्या अधिपत्याखालीच असल्याचा दावा केला आहे. तर राऊत यांनी हे विमानतळ एमएमआयडीसीचे आहे. ते पीपीपी मॉडेलवरील आहे. केंद्र सरकारने केवळ लायसन्स दिले आहे. हा प्रकल्प पूर्णपणे महाराष्ट्राचाच आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले; मात्र विमानतळाचा अधिकार कुणाकडेही असला तरी एखाद्या राज्यात एखाद्या प्रकल्पाचे उद्घाटन होत असेल तर त्या कार्यक्रमाचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांना द्यावेच लागते. कार्यक्रम पत्रिकेतही मुख्यमंत्र्यांचे नाव टाकावे लागते.










