मराठा कम्युनीटी ही बिझनेस कम्युनिटी झाली पाहिजे – प्रविणदादा गायकवाड

0
221
जामखेड प्रतिनिधी 
          जामखेड न्युज – – (सुदाम वराट) – 
 मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले.महाराष्ट्राबाहेर, देशाबाहेर महाराष्ट्रातील सर्व लोकांना मराठा म्हणून ओळखले जाते.भविष्यात ही मराठा कम्युनिटी बिझनेस कम्युनिटी म्हणून ओळखली जावी असे माझे स्वप्न आहे. त्यासाठीच “अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला” ही संकल्पना घेऊन संभाजी ब्रिगेडची भविष्यातील वाटचाल व्हावी अशी माझी अपेक्षा आहे.जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी प्रत्येकाने आर्थिकदृष्ट्या सक्षम बनणे ही काळाची गरज बनली आहे. काळाची पावले ओळखून आपण मार्गक्रमण करायला हवे. असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण दादा गायकवाड यांनी केले.
रविवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी पुणे येथील हायात रिजेन्सी या पंचतारांकीत हॉटेल मध्ये संघटनेच्या पदाधिकार्‍यांची बिझनेस कॉन्फरन्स पार पडली. या कार्यक्रमाचे उदघाटन बारामती अँग्रोचे सी.ई.ओ.,उदयोजक, आमदार रोहीतदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले की,व्यवसाय करतांना आपल्याला स्वतःलाच ठरवावे लागते आपण कोणता व्यवसाय करू शकतो व त्याच्या यशस्वीते साठी आपण सतत प्रामाणिक व एकनिष्ठ राहुन प्रयत्न करायला हवेत. अडचणीच्या काळात तरूणांना दिशा देण्याचे काम प्रवीण दादा गायकवाड व त्यांची संघटना करीत आहे हे प्रशंसनीय आहे.
एकंदरीत सहा सत्रांच्या तरूणांनी नवी दिशा देणार्‍या या कार्यक्रमात पहिल्या सत्रात यु.के. रिसॉर्टचे मुख्य संचालक संतोष पाटील यांनी स्वतःच्या उदयोगातील आरंभ ते आजपर्यंतचा काळ कथित करतांना तरूणांनी काय काळजी घ्यावी व कशाप्रकारे स्वत:ला उदयोगासाठी सक्षम बनावे याचे सुंदररित्या विश्लेषण केले.
बिझिनेस आणि बिझनेस या सत्रात आपले विचार मांडताना चिंतामणी मोटर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर उज्वल साठे यांनी उदयोगामधील शास्त्रशुध्द बारकावे मांडुन उदयोगामधील एन्ट्री ते एक्झिट पर्यंतचा प्रवास विषद केला.युवा उदयोजक अजयसिंह सावंत खास व महेश कडुस यांनी अनुक्रमे दुबई व इज्राईल मधील उदयोग व्यवसाय व नोकरीतली संधी याबाबतीत मार्गदर्शन केले.
एक प्रगतशिल शेतकरी ते इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशनचे संस्थापक अभिजीत शिंदे यांनी जगभरातील मार्केट मध्ये शेतकर्‍यांच्या मालाला असलेल्या मागण्या व निर्यात करतांनाचे बारकावे समजावुन सांगितले.
प्रसिध्द शेतकरी व वक्ते मा. इंद्रजित देशमुख यांनी आपल्या नाॅलेज-स्कील-अॅटिट्युड या संदर्भातील सत्रात छत्रपती शिवराय व संतांच्या अभंगातील दाखले देऊन तरूणांमध्ये आपल्या ओघवत्या शैलीने चैतन्य जागृत केले. प्रविण दादांच्या या कार्यक्रमामुळे मला देखील माझ्या शेतातील उत्पादनाचे मार्केटिंग जागतीक पातळीवर नेण्याची प्रेरणा मिळाली.
शेवटच्या सत्रात सिनेसृष्टीतील यशस्वी प्रसिध्द कलाकार सुपरस्टार भरत जाधव, मराठी व हिंदी सिनेमा सृष्टीतील कलाकार अशोक समर्थ, सैराट फेम व झुंड सारख्या प्रसिध्द चित्रपटाचे निर्माते  नागराज मंजुळे व नवोदित उभरता कलाकार ” कारभारी लयभारी ” फेम निखिल चव्हाण यांनी सिने-कला क्षेत्रातील विविध संधी बाबत संवाद साधला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी ब्रिग्रेडचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधीरराजे भोसले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महासचिव सुभाष बोरकर, आत्माराम शिंदे, उपाध्यक्ष राजेद्र आढाव, छगन शेरे, शरद चव्हाण कार्याध्यक्ष हिंदुराव हुजरे पाटील, अमोल काटे, दिनेश इंगोले, रमेश हांडे, दशरथ गव्हाणे,अजय भोसले, विशाल तुळवे यांनी परिश्रम घेतले.सुत्रसंचालन प्रसिध्द कवी स्वप्नील चौधरी व प्रज्ञेश मोळक यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here