‘ई-पीक पाहणी’ ॲपवर शेतकऱ्यांनी पीक पेरा नोंदवावा – गोविंद शिंदे. – शिर्डी उपविभागात आतापर्यंत ६०३५ शेतकऱ्यांकडून पिकांची ऑनलाईन नोंदणी

0
220
जामखेड प्रतिनिधी
          जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
 महसूल विभागाने १५ ऑगस्ट २०२१ पासून सुरू केलेले ‘ई-पीक पाहणी’ मोबाईल ॲप डॉऊनलोड करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्वत: आपल्या पिकांची नोंदणी ऑनलाईन करावी. असे आवाहन शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी केले आहे.
 राज्यातील शेतकऱ्यांना स्वतःचा पेरा स्वतःच्या अँड्रॉइड मोबाईलमधून भरता यावा, याकरीता राज्य शासनाने १५ ऑगस्ट, २०२१ पासून ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्प सुरू केला आहे. “माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार, माझा पीकपेरा” असे या मोहिमेचे घोषवाक्य आहे. अहमदनगर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी उपविभागातील तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल यांनी यासाठी आवश्यक ते नियोजन केले आहे. बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने या ॲपबाबत कम्युनिटी रेडिओ व इतर माध्यमातून जाणीव-जागृती केली जात आहे.
शिर्डी उपविभागात १५ ऑगस्टपासून खातेदार शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष ‘ई-पीक पाहणी’ करण्यास सुरूवात केली आहे. महसूल यंत्रणेच्या सक्रीय सहभागामुळे राहाता व कोपरगांव तालुक्यात ‘ई-पीक पाहणी’चे काम जलदगतीने सुरू आहे. आतापर्यंत राहाता तालुक्यातील ६१ गावांमधील ३१५१ खातेदार शेतकऱ्यांनी हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये स्थापित (डाऊनलोड) केले आहे. तर यापैकी २९०० शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष पीक पाहणीची नोंद केली आहे. तर कोपरगांव तालुक्यातील ७९ गावांमधील ३३३४ खातेदार शेतकऱ्यांनी हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये स्थापित केले आहे. तर यापैकी ३१३५ शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष पीक पाहणीची नोंद केली आहे.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस, मुंबई यांच्या मदतीने शासनाने या ॲपची निर्मिती केली आहे. ‘ई-पीक पाहणी’ हा शासनाचा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे. यामुळे पिकांचे अचूक क्षेत्र कळणार आहे. या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये शेतकरी पिकांची माहिती भरतील, तलाठी या पिकांच्या नोंदी तपासून घेतील. यामुळे पीक पेरणीची रियल टाईम माहिती ॲप्लिकेशनमध्ये संकलित होणार आहे. तसेच ही माहिती संकलित होताना पारदर्शकता येणार आहे.
याॲपमध्ये पीक पाहणी कशी करावी याबाबत स्थानिक स्तरावर तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, सेतू केंद्र, नागरी सेवा केंद्र व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यांच्या मदतीने शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची नोंद ऑनलाईन करावी. असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here