सात दिवस भक्तीचा जागर, उत्तम महाराज वराट यांच्या काल्याच्या कीर्तनाने साकत नगरी दुमदुमली, रक्तदान शिबिरासह गुणवंतांचा गौरव
श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज यांच्या ४४ व्या पुण्यतिथीनिमित्त साकत (ता. जामखेड) येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची ह.भ.प. उत्तम महाराज वराट यांच्या काल्याच्या कीर्तनाने भक्तिमय वातावरणात सांगता झाली. सात दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्यात हरिनामाचा गजर, भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी परिसरातील वातावरण भक्तिरसाने भारावून गेले.
काल्याच्या कीर्तनात उत्तम महाराज वराट यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे निरूपण करताना भक्तीचे महत्त्व विशद केले. यावेळी त्यांनी, ‘उपजोनिया पुढती यावें । दही भात खात जावें ॥१॥ पंढरीची वारी करीन । विठ्ठल विठ्ठल म्हणेन ॥ध्रु॥ संसाराचा नाही मोह । पांडुरंगी जडला जीव ॥२॥ तुका म्हणे गर्भवासी । दुःख नाही ऐसा कैसी ॥३॥ या अभंगाच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांची विठ्ठलभक्ती आणि पांडुरंगाच्या चरणी असलेली निष्ठा यांचे सुंदर विवेचन केले. ‘मला मोक्ष नको, पुन्हा जन्म मिळाला तरी चालेल; साधा दहीभात खाता खाता मुखाने विठ्ठलनामाचा जप करावा आणि पंढरीची वारी करावी. कारण पांडुरंगाच्या भक्तीतच खरे समाधान आणि जीवनाचे सार आहे,’ असा अभंगाचा भावार्थ सांगत महाराजांनी उपस्थित भाविकांना भक्तिमार्गाची प्रेरणा दिली. त्यांच्या कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.
या कीर्तन सोहळ्यास मृदंगाचार्य बाजीराव महाराज वराट, उत्तरेश्वर महाराज वराट, बाबा महाराज मुरूमकर, गायनाचार्य कृष्णा महाराज मोरे, अनिरुद्ध महाराज शिंदे, बिबिषण महाराज कोकाटे, हरीभाऊ काळे, माऊली महाराज कोल्हे, अशोक महाराज सपकाळ यांच्यासह अनेक वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते.विशेष म्हणजे बाजीराव महाराज वराट यांच्या नर्मदेश्वर वारकरी गुरुकुल, अकोलनेर (जि. अहिल्यानगर) येथील मोठ्या संख्येने वारकरी सातही दिवस सप्ताहात सहभागी झाले होते.
काल्याच्या कीर्तनासाठी परिसरातील भाविक-भक्तांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी माजी सभापती संजय वराट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व विद्यमान संचालक कैलास वराट, उपसरपंच राजाभाऊ वराट, प्रगतशील शेतकरी अविन लहाने, आदर्श शिक्षक रोहित घोडेस्वार, नवनाथ बहिर, अरूण मुरूमकर, श्री साकेश्वर विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद यांच्या सह परिसरातील माता भगिनी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्तदान शिबिरातून सामाजिक बांधिलकी धार्मिक कार्यक्रमांसोबत सामाजिक उपक्रमालाही सप्ताहात महत्त्व देण्यात आले.
भगवंत ब्लड बँक, बार्शी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भक्तीबरोबरच समाजसेवेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
गुणवंतांच्या सन्मानाने सप्ताहाची शोभा वाढली सोमवार, दि. २ नोव्हेंबर रोजी सप्ताहानिमित्त परिसरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता. धार्मिक परंपरेबरोबरच सामाजिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यात आले.
सात दिवस चाललेल्या या अखंड हरिनाम सप्ताहात भक्ती, अध्यात्म, सामाजिक बांधिलकी आणि गुणवंतांचा गौरव अशा विविध उपक्रमांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होताच उपस्थित भाविकांनी सद्गुरू बोधले महाराजांच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले.