जामखेड न्युज – – – – –
जामखेडमध्ये खराब रेशन धान्याच्या तक्रारीनंतर पुरवठा विभाग अॅक्शन मोडवर!
तहसीलदारांसह अधिकाऱ्यांची गोडाऊन ते रेशन दुकानांपर्यंत तपासणी

जामखेड तालुक्यात रेशनवरील खराब धान्य आणि तांदळाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर पुरवठा विभाग अॅक्शन मोडवर आला आहे. तहसीलदार शितलकुमार साळवे यांच्यासह पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी गोडाऊन तसेच रेशन दुकानांना भेटी देऊन धान्याच्या गुणवत्तेची पाहणी केली. तपासणीदरम्यान धान्य चांगल्या स्थितीत आढळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र, रेशनवर मिळणाऱ्या धान्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली आहे.

अहिल्यानगर जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी २६ ऑक्टोबर रोजी खराब धान्याच्या प्रश्नासंदर्भात शासनाला पत्र दिले होते. धान्याची गुणवत्ता नियंत्रकामार्फत तपासणी करून त्यानंतरच पुरवठा करण्यात यावा, अशी भूमिका या पत्रातून मांडण्यात आली होती.

दरम्यान, ३० ऑक्टोबर रोजी तहसीलदार शितलकुमार साळवे यांनी गोडाऊनची तपासणी केली. या तपासणीमध्ये धान्य चांगल्या स्थितीत आढळल्याचे सांगण्यात आले. तसेच काही सूचना ही दिल्या त्यानंतर आज सोमवार, २ नोव्हेंबर रोजी पुरवठा निरीक्षक जालिंदर कदम यांनी रेशन दुकानाला भेट देऊन धान्याची पाहणी केली. या वेळीही धान्य चांगले असल्याचे आढळल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली.

खराब धान्याची गाडी परत पाठवल्याचा दावा
याबाबत पुरवठा निरीक्षक जालिंदर कदम यांनी सांगितले की, मागील महिन्यात १२ ऑक्टोबर रोजी खराब धान्याची एक गाडी आली होती. मात्र, ते धान्य स्वीकारण्याऐवजी संबंधित गाडी परत पाठवण्यात आली. धान्याच्या गुणवत्तेबाबत विभागाकडून काळजी घेतली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.रेशनधारकांनी खराब धान्य स्वीकारू नये असेही त्यांनी सांगितले.




