जामखेड पोलिसावर जीवघेणा हल्ला, १३ गुन्ह्यांचा रेकॉर्ड असलेल्या विनोद जाधवसह पत्नी, आईवर गुन्हा
मिरज ते सातारा रेल्वे लुटीसह विविध गंभीर गुन्हे दाखल
तुळजाभवानी मातेच्या पलंग दर्शनासाठी गर्दी जमलेली असताना पोलिसावरच लोखंडी गजाने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकांचे खिसे चाचपडत असल्याच्या संशयावरून एका व्यक्तीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असताना हा प्रकार घडला. या झटापटीत पोलीस कॉन्स्टेबलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. विशेष म्हणजे, या प्रकरणातील मुख्य आरोपी विनोद सखाराम जाधव याच्याविरुद्ध यापूर्वी विविध पोलीस ठाण्यांत १३ गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जामखेडमध्ये या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
नेमकं काय घडलं? मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल कुलदीप पांडुरंग घोळवे (वय ३७) हे नागेश्वर मंदिर परिसरात बंदोबस्तासाठी तैनात होते. १७ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास विनोद सखाराम जाधव हा गर्दीतील नागरिकांचे खिसे चापसत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
घोळवे यांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, त्याची पत्नी अर्चना विनोद जाधव आणि आई भामाबाई सखाराम जाधव यांनी घटनास्थळी येऊन हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे. तिघांनी मिळून घोळवे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत आरोपीला सोडवून नेण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
लोखंडी गजाने डोक्यात वार; पोलीस कर्मचारी जखमी या झटापटीदरम्यान विनोद जाधव याने बाजूला पडलेला लोखंडी गज उचलून पोलीस कॉन्स्टेबल घोडके यांच्या डोक्यात मारल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात घोळवे गंभीर जखमी झाले. आरोपीला पकडण्यासाठी मदतीला आलेले होमगार्ड वांजुळकर आणि सहायक पोलीस निरीक्षक मोरे यांनाही मारहाण करून दुखापत केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
जखमी अवस्थेतही कॉन्स्टेबल घोळवे यांनी आरोपीला पुन्हा ताब्यात घेतले. गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवरच हल्ला झाल्याने या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
विनोद जाधवच्या १३ गुन्ह्यांचा रेकॉर्ड चर्चेत या घटनेतील मुख्य आरोपी विनोद सखाराम जाधव याच्याविरुद्ध यापूर्वी विविध पोलीस ठाण्यांत एकूण १३ गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. उपलब्ध माहितीनुसार, या प्रकरणांमध्ये जामखेड, पाटोदा तसेच सातारा मिरज मनमाड रेल्वे पोलीस ठाण्यांतील गुन्ह्यांचा समावेश आहे.
जामखेडमधील जुनी प्रकरणे : सन २०११ मध्ये अपहरण व बलात्काराशी संबंधित गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. संबंधित प्रकरणात आरोपी निर्दोष ठरल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच २०१५ मध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल असून तो न्यायालयात प्रलंबित असल्याची माहिती देण्यात आली आहे. रेल्वे पोलिसांतील प्रकरणे : सातारा रेल्वे पोलीस ठाण्यात चार, तर मनमाड आणि नांदगाव येथील रेल्वे पोलीस ठाण्यांत दोन गुन्हे नोंद असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय मिरज रेल्वे पोलीस ठाण्यातील २०१८ मधील दोन गुन्ह्यांमध्ये आरोपी फरार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७०६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम १३२, १२१(१), १२१(२) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १. विनोद सखाराम जाधव २. अर्चना विनोद जाधव ३. भामाबाई सखाराम जाधव तिघेही आरोळे वस्ती, जामखेड येथील रहिवासी आहेत. पोलीस कॉन्स्टेबल कुलदीप घोडके यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक गणेश आघाव पुढील तपास करीत आहेत.
गर्दीच्या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर धार्मिक सोहळे आणि उत्सवांच्या काळात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत असते. अशा वेळी खिसेकापू आणि इतर गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त महत्त्वाचा ठरतो. मात्र, कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवरच हल्ला होण्याच्या या घटनेने गर्दीच्या ठिकाणच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांवरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.