जामखेड शहरात तुळजाभवानी मातेचा सातव्या माळेला येणारा पलंग दर्शनासाठी दाखल झाल्याने भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. या गर्दीचा फायदा घेऊन खिसे कापणारे आणि चोरी करणारे सक्रिय होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केला होता. मात्र, याच गर्दीत खिसे कापताना दिसलेल्या एका कथित सराईत चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न करताना त्याने पोलीस कॉन्स्टेबलच्या डोक्यात पोलिसांकडील काठीने प्रहार केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड नगरपरिषदेच्या नवीन इमारतीजवळ गर्दीच्या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल कुलदीप घोळवे यांना एक कथित सराईत चोरटा नागरिकांचे खिसे कापताना दिसला. त्याला पकडण्यासाठी घोळवे यांनी प्रयत्न केला असता, गर्दीचा फायदा घेत आरोपीने त्यांच्याच हातातील काठी हिसकावून त्यांच्या डोक्यात मारली. या अचानक झालेल्या हल्ल्यात कॉन्स्टेबल कुलदीप घोळवे गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच इतर पोलिसांनी तत्परतेने हालचाली करत आरोपीला पकडले.
पोलिसांवरच हल्ला; गर्दीतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! तुळजाभवानी मातेच्या पलंगाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक जामखेड शहरात दाखल होत असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात होता. मात्र, चोरी करताना पकडण्याच्या प्रयत्नात पोलिसांवरच हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. आरोपीविरुद्ध नेमकी कोणती कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, गर्दीच्या ठिकाणी भाविकांनी आपल्या मौल्यवान वस्तू, मोबाईल आणि पैशांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.