जामखेड न्युज – – – – –
शिक्षक द्या, पाचवीचा वर्ग सुरू करा! मागण्या दुर्लक्षित होताच, शाळेला पालकांनी ठोकले कुलूप
जामखेड तालुक्यातील बांधखडक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चव्हाणवस्ती येथे शिक्षकाची तात्पुरती नियुक्ती रद्द करून मूळ शिक्षक पुन्हा शाळेत पाठवावा, तसेच शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता पाचवीचा वर्ग सुरू करण्यास मंजुरी द्यावी, या मागणीसाठी संतप्त पालक व ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले. प्रशासनाकडून वारंवार मागणी करूनही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

चव्हाणवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सध्या इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेतील उपशिक्षक विकास मधुकर सौने यांची गेल्या तीन महिन्यांपासून तात्पुरत्या स्वरूपात अन्य शाळेत नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे शाळेतील उपलब्ध शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा भार पडत असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून शाळेत इयत्ता पाचवीचा वर्ग सुरू करण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सचिव तसेच ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे प्रस्तावही सादर करण्यात आला होता. मात्र, प्रस्तावावर अद्याप निर्णय न झाल्याने पालक व ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

शिक्षकाची पूर्ववत नियुक्ती करावी आणि पाचवीचा वर्ग सुरू करण्यास मंजुरी द्यावी, यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते.मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, दिलेल्या मुदतीत कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी अखेर शाळेला कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतला.


