“कारवाई सुरू असतानाच दगडफेक आणि मारहाण, सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप”
जामखेड शहरातील बीड रोड परिसरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला मंगळवारी (दि. ६ ऑक्टोबर) हिंसक वळण लागल्याचा प्रकार समोर आला आहे. अतिक्रमण हटाव कारवाईदरम्यान नगरपरिषद कर्मचाऱ्याला दगड मारून जखमी केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर या कारवाईत दाखल झालेला हा पहिला गुन्हा असल्याचे समोर आले आहे.विजय आष्टेकर, त्यांची पत्नी तसेच दत्तात्रय आष्टेकर (पूर्ण नाव माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी साडेएकच्या सुमारास बीड रोडवरील आष्टेकर सॅन्क्स हॉटेल परिसरात मा. उच्च न्यायालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या आदेशानुसार तसेच जामखेड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटाव कारवाई सुरू होती.
फिर्यादी संभाजी अजिनाथ डोके (वय ३०, रा. भुतवडा, ता. जामखेड) हे नगरपरिषदेच्या सहकाऱ्यांसह अतिक्रमण काढण्याचे काम करीत असताना आरोपी क्रमांक १ व २ हे हॉटेलच्या स्लॅबवर उभे राहून दगड मारल्याने डोके जखमी झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
त्यानंतर आरोपी क्रमांक ३ याने शिवीगाळ करून फिर्यादीची गचांडी धरली व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खाली पाडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच सरकारी कामात अडथळा आणत फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही पोलिसांत दाखल तक्रारीत नमूद आहे.
या घटनेमुळे अतिक्रमण हटाव कारवाईदरम्यान काम करणाऱ्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अतिक्रमणांच्या कारवाईला सुरुवात झाल्यानंतर हा प्रकार घडल्याने प्रशासनाकडून पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ६८२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, १२१(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार एस. डी. लोखंडे पुढील तपास करीत आहेत. गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, जामखेड शहरातील बीड रोडलगत अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असून, प्रशासनाच्या या कारवाईदरम्यान कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. अतिक्रमण कारवाईला विरोध करणाऱ्या आणि कारवाईत अडथळा निर्माण करणाऱ्या घटनांवर प्रशासन व पोलिसांकडून आता कोणती भूमिका घेतली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.