जामखेडमध्ये रोजगाराची ‘लॉटरी’! ४३५ युवक-युवतींची थेट नोकरीसाठी निवड, ९२९ उमेदवारांचा उत्स्फूर्त सहभाग आ. रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळावा
जामखेडमध्ये रोजगाराची ‘लॉटरी’! ४३५ युवक-युवतींची थेट नोकरीसाठी निवड, ९२९ उमेदवारांचा उत्स्फूर्त सहभाग
आ. रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळावा
ग्रामीण भागातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि अनुभवाच्या आधारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्याला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नागेश विद्यालय व कन्या विद्यालय येथे झालेल्या या मेळाव्यात तब्बल ९२९ युवक-युवतींनी सहभाग नोंदवला, तर विविध नामांकित कंपन्यांच्या मुलाखतींतून ४३५ उमेदवारांची ऑन द स्पॉट नोकरीसाठी निवड करण्यात आली. याशिवाय १३५ उमेदवारांना पुढील प्रक्रियेसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आले. निवड झालेल्या उमेदवारांना यावेळी नियुक्तीपत्रेही प्रदान करण्यात आली. रयत शिक्षण संस्थेचा उत्तर विभाग, नागेश व कन्या विद्यालय, कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था आणि आमदार रोहित पवार मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या शोधासाठी मोठ्या शहरांकडे स्थलांतर करावे लागू नये, तसेच त्यांच्या शिक्षण, कौशल्य आणि अनुभवाला अनुरूप रोजगाराच्या संधी स्थानिक पातळीवरच उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने विविध कंपन्या आणि रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना एकाच व्यासपीठावर आणण्यात आले.
या रोजगार मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभाग, अहिल्यानगरच्या समन्वय समितीचे सदस्य राजेंद्रजी कोठारी होते. यावेळी रयत शिक्षण संस्था, उत्तर विभाग, अहिल्यानगरच्या सल्लागार समितीचे सदस्य विजयसिंह गोलेकर, जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट, सूर्यकांत नाना मोरे, सागर कोल्हे ॲड. मयूर डोके यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
विविध नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सहभागी उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि अनुभवाच्या आधारे प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या. त्यामुळे रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्याची आणि रोजगाराची संधी मिळाली. एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने कंपन्या उपलब्ध झाल्याने उमेदवारांना विविध क्षेत्रातील रोजगाराच्या संधींची माहितीही मिळाली.
४३५ उमेदवारांची थेट निवड झाल्याने मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्याचबरोबर १३५ उमेदवार पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र ठरल्याने रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक युवक-युवतींसाठी हा मेळावा आशेचा किरण ठरला. युवकांच्या हाताला काम आणि त्यांच्या कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी अशा रोजगाराभिमुख उपक्रमांना सातत्याने व्यापक स्वरूप देण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी नागेश विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. व्ही. जाधवर, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आर. आर. भोर, प्रशांत काका राळेभात, वसीम सय्यद, राजेंद्र गोरे, इस्माईल भाई सय्यद, माजीत कुरेशी यांच्यासह नगरसेवक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
तसेच सोले पाटील, सचिन शिंदे, सागर कोल्हे, रमेश आजबे, मंगेश आजबे, दादा राजे भोसले, नरेंद्र जाधव, काका कोल्हे, गणेश चव्हाण, शरद शिंदे, प्रशांत वारे, कुंडल राळेभात, बापू कार्ले, बबनआबा तुपेरे, सतीश शिंदे, प्रकाश काळे, प्रदीप शेटे, प्रवीण उगले, बाबासाहेब खैरे, रावसाहेब जाधव, नासिर चाचू, विभीषण परकड, प्रल्हाद गीते, दीपक नेटके, संदीप गायकवाड, सचिन डोंगरे, दादा महाडिक, हनुमंत भोसले, प्रणव राळेभात यांच्यासह दोन्ही विद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
रोजगार मेळावा समन्वयक श्रीराम सातपुते यांनी मेळाव्याचे नियोजन व समन्वय केले. विविध नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी, ग्रामस्थ, पालक तसेच जामखेड तालुका व पंचक्रोशी परिसरातून मुलाखतीसाठी आलेले उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. ९२९ युवक-युवतींचा सहभाग, ४३५ जणांची थेट निवड आणि १३५ उमेदवारांची पुढील प्रक्रियेसाठी निवड, या आकडेवारीमुळे जामखेडमधील हा रोजगार मेळावा ग्रामीण भागातील युवकांसाठी रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.