महामार्ग, दुष्काळ, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, पाणीटंचाई अन् मायक्रो फायनान्सचा विळखा!
रोहित पवारांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना धरले धारेवर!
कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांवर आमदार रोहित पवार यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. जामखेड तालुक्यातून जाणाऱ्या प्रस्तावित सूरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाच्या भूसंपादनातील त्रुटी, शेतकऱ्यांना योग्य मोबदला, अतिवृष्टीची प्रलंबित नुकसानभरपाई, मायक्रो फायनान्स कंपन्यांची सक्तीची वसुली, जलजीवन मिशनची रखडलेली कामे आणि भीषण पाणीटंचाई असे विविध प्रश्न त्यांनी प्रशासनासमोर मांडले. याशिवाय कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांचीही भेट घेतली.
महामार्गाला विरोध नाही; शेतकऱ्यांवर अन्याय नको! जामखेड तालुक्यातील १३ गावांमधून प्रस्तावित सूरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. मात्र, जमिनीच्या मूल्यांकनाबाबत संभ्रम आणि भूसंपादन प्रक्रियेतील त्रुटी असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. यावर संबंधित शेतकऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेत रोहित पवार यांनी योग्य मूल्यांकन, न्याय्य मोबदला आणि संपूर्ण प्रक्रियेची पारदर्शक फेरतपासणी करण्याची मागणी केली. शेतकऱ्यांच्या हरकतींचे निराकरण झाल्याशिवाय भूसंपादन करू नये, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
अतिवृष्टीची भरपाई अद्याप नाही; दुष्काळाने शेतकरी संकटात! मागील वर्षीच्या अतिवृष्टीमुळे शेती, विहिरी, विद्युत पंप, शेतीची अवजारे आणि सोलर पंपांचे मोठे नुकसान झाले. मात्र, अनेक शेतकरी अद्याप नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. एकीकडे जुन्या नुकसानीची भरपाई मिळालेली नाही, तर दुसरीकडे दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे प्रलंबित नुकसानभरपाई तातडीने देण्याची मागणी त्यांनी केली.
मायक्रो फायनान्सच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती द्या! दुष्काळी परिस्थितीत आर्थिक संकटात सापडलेल्या महिला आणि सर्वसामान्य कर्जदारांकडून मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून सक्तीची वसुली होत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. अशा वसुलीला स्थगिती मिळण्यासाठी शासनाने रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा करावा, तसेच जिल्हास्तरावर स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा सुरू करावी, अशी मागणी केली.
जलजीवन मिशनची कामे रखडली; टँकरने ६० लिटर पाणी द्या! मतदारसंघातील अनेक गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे ९० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाली असतानाही ठेकेदारांची बिले थकल्याने कामे रखडली आहेत. थकीत बिले अदा करून उर्वरित कामे कालमर्यादेत पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच दुष्काळग्रस्त गावांमध्ये छोटे टँकर उपलब्ध करून द्यावेत, टँकरद्वारे मिळणारे प्रतिमाणशी ४० लिटर पाणी वाढवून ६० लिटर करावे आणि जनावरांसाठी स्वतंत्र पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली. कर्जत तालुक्यातील उपलब्ध जलस्रोतांमधून पाणी उपशावरील निर्बंध शिथिल करण्याची मागणीही त्यांनी मांडली.
पोलीस अधीक्षकांची भेट; निष्पक्ष कारवाईची मागणी दरम्यान, मतदारसंघातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांच्या तक्रारी आणि दबावाखाली होणाऱ्या कथित चुकीच्या कारवायांबाबत रोहित पवार यांनी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची भेट घेतली. कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्षपणे कारवाई करावी आणि नागरिकांच्या तक्रारींचे योग्य निराकरण करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या बैठकांवेळी जिल्हाध्यक्ष सीताराम काकडे, संदीप वर्पे, तालुकाध्यक्ष रघुआबा काळदाते यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी, शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते.