Sunday, September 27, 2026
Home ताज्या बातम्या आदर्श फाउंडेशनकडून गणेश मंडळांचे मानाचा फेटा बांधून स्वागत! गणरायाला भक्तिभावाने निरोप,...

आदर्श फाउंडेशनकडून गणेश मंडळांचे मानाचा फेटा बांधून स्वागत! गणरायाला भक्तिभावाने निरोप, शांततापूर्ण विसर्जनाबद्दल आकाश बाफना यांनी मानले पोलिस प्रशासनाचे आभार

0
2
आदर्श फाउंडेशनकडून गणेश मंडळांचे मानाचा फेटा बांधून स्वागत!  गणरायाला भक्तिभावाने निरोप, शांततापूर्ण विसर्जनाबद्दल आकाश बाफना यांनी मानले पोलिस प्रशासनाचे आभार

जामखेड न्युज – – – – – 

आदर्श फाउंडेशनकडून गणेश मंडळांचे मानाचा फेटा बांधून स्वागत!

गणरायाला भक्तिभावाने निरोप, शांततापूर्ण विसर्जनाबद्दल आकाश बाफना यांनी मानले पोलिस प्रशासनाचे आभार

श्री गणेशोत्सवानिमित्त जामखेड शहरात दाखल होणाऱ्या विविध गणेश मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आदर्श फाउंडेशनच्या वतीने मानाचा फेटा बांधून उत्साहात स्वागत करण्यात आले. गणेशोत्सवातील भक्ती, उत्साह आणि सामाजिक एकोपा अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष तथा शिवसेना युवानेते आकाश बाफना यांच्या पुढाकारातून दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश मंडळांच्या स्वागताचा उपक्रम घेण्यात आला. जामखेड शहरात येणाऱ्या गणेशभक्तांना आपलेपणाची आणि सन्मानाची भावना मिळावी, तसेच गणेश मंडळांच्या सामाजिक व धार्मिक कार्याला प्रोत्साहन मिळावे, या हेतूने मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि परस्पर सहकार्य वाढविणारा उत्सव ठरावा, यासाठी आदर्श फाउंडेशनकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. गणेश मंडळांकडून सामाजिक, धार्मिक आणि जनजागृतीपर उपक्रम राबविले जात असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेत सन्मान करण्याची परंपराही फाउंडेशनने जोपासली आहे. या उपक्रमाला गणेश मंडळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रा. कैलास माने, युवा नेते पांडुरंग माने, शिवा संघटनेचे अध्यक्ष शिवकुमार डोंगरे, माजी नगरसेवक शामिर सय्यद, गणेश आजबे, गुड्डू विटकर, पोपट जगदाळे, युवा उद्योजक विकास बाफना, दत्ता जगताप यांच्यासह शिवसेना व आदर्श फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गणेश मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर जामखेड शहरात गणेश विसर्जन मिरवणुका भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले.

गणेश मंडळांच्या उत्साहाला शिस्तीची जोड मिळाल्याने विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या. याबद्दल आकाश बाफना यांनी जामखेड पोलिस प्रशासनाचे विशेष आभार मानले. गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी गणेश मंडळे, कार्यकर्ते, नागरिक आणि पोलिस प्रशासनाने केलेल्या सहकार्याचे त्यांनी कौतुक केले.
गणरायाला भक्तिभावाने निरोप देताना शहरातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. स्वागत आणि सन्मानाच्या या उपक्रमामुळे गणेश मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्येही समाधान व्यक्त करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!