निरोगी आरोग्यासाठी कायम लक्षात ठेवा या ९ गोष्टी!!!

0
191
जामखेड न्युज – – – 
करोना, लॉकडाउन, वर्क फ्रॉम होम, क्वारंटाइन अशा अनेक शब्दांची ओळख करून देणारं २०२० – २१ हे वर्ष कोरोना मुळे खुपच कठीण चालले हे वर्ष आपल्यासाठी अनेक कारणांनी त्रासदायक ठरलं. पण, जर तुम्ही याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर तुम्हाला नक्कीच काही चांगल्या गोष्टी दिसतील. कठीण काळ शिकवणारा असतो, असं म्हणतात. त्याप्रमाणे या वर्षाने आपल्याला अनेक धडे दिले. आरोग्याबाबत अधिक सजग व्हायला शिकवलं. मुख्य म्हणजे रोगप्रतिकार शक्ती सुधारण्याचं महत्त्व अधोरेखित झालं.
​संतुलित आहार
करोना काळात सर्वाधिक चर्चेत असलेला शब्द म्हणजे रोगप्रतिकार शक्ती. काही मंडळी किटो डाएट करत होती किंवा अगदी कमी प्रमाणात अन्न सेवन करून सेमी स्टार्व्हेशन डाएटचा अवलंब करत होती. तर काही जणांनी दिवसातून एकदाच आहार घेण्याचा पर्याय स्वीकारला. आवश्यक पोषणमूल्य पोटात गेली नाहीत तर अशक्तपणा जाणवणं साहजिक आहे. कर्बोदकं कमी प्रमाणात सेवन करून प्रथिनांचं अधिक प्रमाणात सेवन केल्यास आपल्या शरीरातील घातकद्रव्य वाढतात. फळं आणि धान्य या कर्बोदकांच्या स्रोतांमध्ये नैसर्गिक साखर असते. ती आपल्या शरीराला ऊर्जा देते. कर्बोदकांमधील काही गुणांमुळे शरीरातील पीएचचं संतुलन राखण्यास मदत होते. त्यामुळे संतुलित आहार घेणं किती महत्त्वाचं आहे, हे कळलं.
​व्यायाम करणं आवश्यक
व्यायाम करण्याची का गरज असते, हे लॉकडाउनने शिकवलं. त्या काळात प्रत्येकाने फिट राहण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी व्यायाम करण्याचा मार्ग स्वीकारण्यात आला. नियमित व्यायामप्रकारांसह ऐरोबिक्स, योग, ध्यानधारणा, झुम्बा डान्स हे करण्यावर भर देण्यात आला.
​कामं करा, फिटनेस जपा
घरकाम करणाऱ्या मावशी येत नसताना कपडे धुणं, भांडी घासणं, स्वयंपाक करणं, साफसफाई करणं आणि किराणा सामान खरेदी करणं ही सर्व कामं केली. यामुळे दिवसभर सक्रिय राहू शकलो. त्या काळात आपण सतत कामात व्यग्र असल्यानं मनही सुस्थितीत राहिलं. तर शरीरातील अतिरिक्त कॅलरीज कमी झाल्या. जीवनशैली सुधारली. यापुढेही आपण अशीच जीवनशैली अवलंबल्यास अधिक फिट राहू शकतो, असं तज्ज्ञ सांगतात.
​तंत्रज्ञानाचा योग्य वापर
दैनंदिन जीवनातील अनेक कामं सुरळीतपणे पार पडण्यासाठी मोठ्या खुबीनं तंत्रज्ञानाचा वापर केला गेला. वर्कशॉप्स, क्लास, शाळा, ऑफिसची कामं, विविध कोर्सेस, याचबरोबर किराणा सामानाची खरेदी या सर्व गोष्टींसाठी ऑनलाइन माध्यमांचा वापर करण्यात आला. याकाळात सायकलिंगने निस्सीम आनंद मिळाला. स्वतःला सुदृढ ठेवण्यासाठी अशीच जीवनशैली अवलंबण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
​घरच्या जेवणाला प्राधान्य
लॉकडाउनच्या सुरुवातीला हॉटेल्स बंद होती. याकाळात घरी शिजवलेल्या जेवणाचा आस्वाद घेतला. यामुळे बाहेरचं खाण्याची किंवा बाहेरचं जेवण घरी मागवून खाण्याची सवय मोडली. एवढंच नाही तर करोना काळात बऱ्याच जणांनी स्वयंपाक करण्याचा प्रयोग केला. विविध प्रकारचे पदार्थ बनवले. याकाळात घरी शिजवलेलं अन्न खाल्ल्यामुळे बरं वाटलं. हे सगळं लक्षात ठेवून, ते अंमलात आणून आपण निरोगी जीवनाच्या दिशेनं वाटचाल करू शकलो.
​सांभाळा झोपायच्या वेळा
वेळेवर झोपण्याची आणि सकाळी लवकर उठण्याची सवय लागली. झोपेचं प्रमाण व गुणवत्ता केवळ शरीराची ऊर्जाच वाढवत नाही तर त्यामुळे मानसिक आरोग्य देखील सुधारतं, हे कळलं.
​ताण हाताळा योग्य मार्गाने
लॉकडाउनच्या काळात भीती, अनिश्चितता आणि असुरक्षितता या भावनांनी मनात घर केलं होतं. तसंच या काळानं स्वतःला जाणून घेण्यास, समाधानी राहण्यास आणि आवडीच्या गोष्टी करण्यास भाग पाडलं. यामुळे मानसिक शांतता मिळाली. काहींनी पाककौशल्यं विकसित केली तर काहींनी छंद जोपासले. अशा प्रकारे ताणतणाव योग्य प्रकारे हाताळण्याचा धडा गिरवला.
​आप्तस्वकीयांचं प्रेम
कठीण काळात प्रियजन आणि शेजारपाजारचे मदतीला धावून येतात, हे करोनाने शिकवलं. याकाळात प्रियजन, कुटुंबातील व्यक्ती, मित्र जवळ आले. बऱ्याच जणांनी याआधी कधीही न बोललेल्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित केले. तर जवळच्यांच्या संपर्कात राहिलो. याकाळात नातेसंबंधात सौहार्दता, प्रेम वाढलं. यामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत झाली.
​निसर्गाच्या सान्निध्यात…​
लॉकडाउनचे निर्बंध शिथिल झाले तेव्हा बऱ्याच जणांनी समुद्रकिनारी, थंड हवेच्या ठिकाणी आणि बेटांवर प्रवास करण्यास सुरुवात केली. अनेक दिवस घरीच राहून विविध गॅजेट्सचा वापर करत होतो. यामुळे घराबाहेर जाण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली होती. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवत मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपण्याचा धडा करोनाने शिकवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here