जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील कोष्टी गल्ली या भागात होत असलेले पेव्हिंग ब्लॉकचे काम अर्धवट ठेवून याच निधीतील निम्मे काम दुसरीकडे पळविण्यात आल्यामुळे कोष्टी गल्लीतील नागरिकांनी यात लक्ष घालण्याची मागणी आमदार रोहित पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या बाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या भागात रस्त्या व्हावा अशी येथील नागरिकांची अनेक दिवसांपासून मागणी होती. यानुसार आ.रोहित (दादा) पवार यांनी लेखाशीर्ष २५१५ अंतर्गत खर्डा येथील सेंट्रल बँक ते कोष्टी गल्ली पर्यंत काँक्रीटीकरण करून त्यावर पेविंग ब्लॉक टाकण्यासाठी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्या अनुषंगाने सरपंच आसाराम गोपाळघरे व इतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला व त्या पध्दतीने काम ही सुरू झाले. मात्र सदर काम निम्यापर्यंत पूर्ण झाले असता ग्रामपंचायतच्या काही सदस्यांनी दुसरीकडे गरज नसलेल्या ठिकाणी हे राहिलेले काम पळविण्याचा उद्दोग ठेकेदार व अधिकाऱ्यांना दबाव टाकून केला असून हे पेविंग ब्लॉक चे काम राजीकय हेव्यादेव्यातून पूर्ण करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे येथील संतप्त रहिवाशांनी सांगितले आहे. हा रस्ता खर्डा शहरातील मध्यवस्तीत असून येथून लहान मुले, मुली, महिला व नागरिकांचा अगदी जवळचा रस्ता म्हणून ओळखला जात आहे. येथील पेव्हिंग ब्लॉकचा रस्ता ठरल्या प्रमाणे म्हणजेच सेंट्रल बँक ते कोष्टी गल्लीपर्यंत करावा अशी मागणी निवेदनाद्वारे स्थानिक नागरिकांनी केली आहे.
सदर निवेदनावर शरद गुरसाळी, नितीन गुरसाळी, डॉ. सुदाम खोत, नवनाथ खोत, भरत नवले, शशिकला गुरसाळी, प्रीती गुरसाळी, मुकेश काळे, राहुल तळेकर, कृष्णा काकडे, अमोल नवले, दत्तराज पवार यांच्या सह्या आहेत.