जामखेड न्युज – – –
कधी नव्हे, तो गेल्या वर्षी सोयाबीनला हमीभावापेक्षा अधिक व आजपर्यंतचा सर्वाधिक भाव मिळाला. हंगामाअखेर तर नऊ हजारांपर्यंत भाव पोहोचले. अजूनही बाजार समितीत प्रतिक्विंटल सात ते आठ हजार रुपये भाव मिळत आहे. देवा, यंदाही कृपा राहू दे आणि नवीन सोयाबीन निघेपर्यंत भाव घसरू देऊ नको, असे साकडे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक सध्या देवाला घालत आहेत. शेतमालाला मिळणारा कमी भाव, शेतकरी आत्महत्येचे एक प्रमुख कारण ठरले आहे. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटात सापडून पिकाचे नुकसान होत आले आहे. त्यानंतरही हाती आलेल्या उत्पादनाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होऊन कर्जाच्या बोझ्याने दबलेल्या शेतकऱ्याला आत्महत्येचे पाऊल उचलावे लागले आहे. जिल्ह्यात सोयाबीनचा सर्वाधिक पेरा व उत्पादन होत असल्याने, किमान सोयाबीनला तरी चांगला भाव मिळावा, यासाठी शेतकरी आग्रही असतात.
मात्र, दरवर्षी त्यांचा हिरमोड होतो. गेल्या वर्षी मात्र राज्यात सोयाबीनचे जवळपास निम्मे उत्पादन घटले. शिवाय इतर राज्यांत व देशातही सारखीच स्थिती असल्याने कधी नव्हे तो हमीभावापेक्षा अधिक व आतापर्यंतचा सर्वोधिक (प्रतिक्विंटल नऊ हजार रुपये) भाव सोयाबीनला बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना मिळाला. आताही सात ते आठ हजार रुपये भाव मिळत आहे. मात्र, बाजार समितीमध्ये आवक वाढताच भाव घसरण होत असल्याचा आतापर्यंतचा अनुभव आहे. गेल्या वर्षी झालेली भाववाढ यावर्षी सुद्धा कायम राहील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी यंदाच्या खरिपात सर्वाधिक सोयाबीनची पेरणी केली आहे. पिकांची स्थितीही सध्या चांगली असून, भरघोस उत्पादन होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. त्यामुळे नवीन पीक निघेपर्यंत बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे भाव कायम राहावे, असे साकडे शेतकरी देवाकडे घालत आहेत.
गेल्या हंगामात सोयाबीनचे नऊ हजार रुपयांपर्यंत भाव गेले. या वर्षीही चांगला भाव मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे यंदा सोयाबीनचा पेरा वाढवला आहे. या वर्षी अपेक्षेनुसार उत्पादन झाले व भाव मिळाला तर गेल्या पाच – सहा वर्षांपासून होत आलेले नुकसान काही प्रमाणात भरून निघू शकते. असे शेतकरी वर्गातून मत व्यक्त करण्यात येत आहे.