जामखेड न्युज – –
महाराष्ट्रातील राजकारण काल चांगलच ढवळून निघालं. आरोप-प्रत्यारोप, इशारे, दगडफेक, हाणामारी पाहायला मिळाली. नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक झाली होती. शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. काही ठिकाणी नारायण राणेंचे पोस्टर फाडले, बॅनरला काळं फासलं, प्रतिकात्मक पुतळण्याचं दहन केलं. भाजपा कार्यालयावर दगडफेकीच्या घटना घडल्या.
राणेंविरोधात केलेल्या या आंदोलनामध्ये युवा सेना आघाडीवर होती. युवा सेनेचे नेतृत्व मुख्यमंत्र्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्याकडे आहे. काल रात्री उशिरा या युवा सैनिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. युवा सेनेची कोअर टीम मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेली होती. या भेटीत शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युवासैनिकांची पाठ थोपटली. शिवसेना स्टाईल केलेल्या आंदोलनाबद्दल शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युवा सेनेचे कौतुक केले.
काल नारायण राणेंच्या जुहू बंगल्याबाहेर युवा सैनिक पोहोचले होते. त्यावेळी तिथे युवा सैनिक आणि राणे समर्थक आपसात भिडले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करुन दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्यांना पांगवले. सोमवारी रात्रीच युवा सैनिकांना जुहूमध्ये जमण्याचे आदेश देण्यात आले होते.