जामखेड न्युज – – –
नगर जिल्ह्यातील पारनेरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार निलेश लंके आज भाजपचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असून मुंबई इथे त्यांची भेट झाली आहे. मुंबई-नागपूर असा विमान प्रवासही दोघांनी सोबत केला असल्याच्या माहितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. फडणवीस यांना आ.लंके यांचा महिमा चांगलाच माहीत असून वर्धा इथे आ.लंके जाताना त्यांनी खास आ.लंके सोबत प्रवास केला असल्याची माहिती आहे. आ.लंके हे अजित पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांच्याही विश्वासातील आहेत. राज्यातील एकंदरीत सध्या सुरू असलेल्या घडामोडी पाहता आ.लंके यांचा देवेन्द्र फडणवीस यांच्या सोबतचा स्नेहपूर्वक विमान प्रवास हा नेमका कुठून-कुठे सुरू आहे या बद्दल चर्चा तर होणारच.
वर्ध्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अभिजित फाळके यांचा आज(बुधवारी) वाढदिवस असून त्यानिमित्ताने त्यांनी कोविड योद्धा हा पुरस्कार सोहळा आयोजित केला असून हा पुरस्कार आ.निलेश लंके यांना दिला जाणार आहे. कोविड काळात आ.लंके यांनी पारनेर तालुक्यातील भाळवणी इथे शरदचंद्रजी पवार आरोग्य केंद्राच्या माध्यमातून केलेले काम केवळ राज्यभर नव्हे तर देश भरात गाजले. परदेशातून या कामाची दखल घेतली गेली. या पार्श्वभूमीवर आ.लंके यांना महात्मा गांधींच्या वास्तव्याने पावन झालेल्या वर्धा भूमीत हा पुरस्कार देण्यात येत आहे. अशी माहिती निलेश लंके प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष दादा शिंदे यांनी दिली आहे. या निमित्ताने मुंबई-नागपूर प्रवासात आ.निलेश लंके आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस सोबत असल्याचे समजते. मात्र पुरस्कार हा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून वाढदिवसां निमित्ताने दिला असताना राष्ट्रवादीचे आमदार असलेले लंके हे भाजपचे फडणवीस यांच्या सोबत सकाळपासून विमान प्रवासात सोबत असल्याने काहींचे कान टवकारले असतील हे निश्चित.