Home राजकारण नाहुली सोसायटीला अखेर जिल्हा बँकेचे सभासदत्व, शेतकऱ्यांच्या कर्जाचा मार्ग मोकळा! राम...

नाहुली सोसायटीला अखेर जिल्हा बँकेचे सभासदत्व, शेतकऱ्यांच्या कर्जाचा मार्ग मोकळा! राम शिंदेंच्या पाठपुराव्याला यश, प्रशासक मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

0
7
नाहुली सोसायटीला अखेर जिल्हा बँकेचे सभासदत्व, शेतकऱ्यांच्या कर्जाचा मार्ग मोकळा!  राम शिंदेंच्या पाठपुराव्याला यश, प्रशासक मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

जामखेड न्युज – – – – – 

नाहुली सोसायटीला अखेर जिल्हा बँकेचे सभासदत्व, शेतकऱ्यांच्या कर्जाचा मार्ग मोकळा!

राम शिंदेंच्या पाठपुराव्याला यश, प्रशासक मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नाहुली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सभासदत्वाचा आणि कर्जवाटपाचा रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. संस्थेला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभासदत्व देण्यास तसेच कर्जवाटपाची परवानगी देण्यास प्रशासक मंडळाने मंजुरी दिली आहे. विधानपरिषद सभापती आमदार प्रा. राम शिंदे यांच्या आदेशाने आणि संस्थेचे संस्थापक चेअरमन तथा छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन घुमरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले.


.
नाहुली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची नोंदणी सप्टेंबर २०२२ मध्ये झाली होती. मात्र, त्यानंतर तत्कालीन संचालक मंडळाकडून संस्थेला जिल्हा बँकेचे सभासदत्व मिळाले नसल्याने संस्थेच्या माध्यमातून सभासद शेतकऱ्यांना कर्जवाटप करता येत नव्हते. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता.

दरम्यान, जिल्हा बँकेतील संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर प्रशासक मंडळाची नियुक्ती झाली. या संधीचा पाठपुरावा करत संस्थेचे संस्थापक सचिन घुमरे यांनी विधानपरिषद सभापती आमदार प्रा. राम शिंदे यांच्याकडे वेळोवेळी हा प्रश्न मांडला. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून संस्थेला बँकेचे सभासदत्व मिळावे आणि कर्जवाटपाचा मार्ग खुला व्हावा, यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. अखेर प्रशासक मंडळाने नाहुली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेला जिल्हा बँकेचे सभासदत्व देण्याचा आणि कर्जवाटपासाठी मंजुरी देण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयामुळे नाहुली परिसरातील शेतकरी आणि संस्थेच्या सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता संस्थेच्या माध्यमातून सभासदांना पीक कर्ज, मध्यम मुदतीचे कर्ज तसेच विविध कृषीपूरक योजनांसाठी अर्थसाहाय्य उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

“संस्थेला जिल्हा बँकेचे सभासदत्व मिळावे आणि कर्जवाटपाची परवानगी मिळावी यासाठी आमदार प्रा. राम शिंदे यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. त्यांच्या खंबीर पाठपुराव्यामुळेच हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला,” अशी भावना संस्थेचे संस्थापक चेअरमन सचिन घुमरे यांनी व्यक्त केली.

जिल्हा बँकेकडून कर्जवाटपाची परवानगी मिळाल्याने नाहुली सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुलभ, जलद आणि पारदर्शक पद्धतीने आर्थिक सेवा देण्याचा संस्थेचा मानस असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. या निर्णयाबद्दल सोसायटीचे संचालक मंडळ, सभासद तसेच परिसरातील शेतकऱ्यांकडून आमदार प्रा. राम शिंदे आणि प्रशासक मंडळाचे आभार मानले जात असून, सोसायटीचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

चौकट

लवकरच शेतकऱ्यांच्या हाती कर्जाचे चेक!
विधानपरिषद सभापती आमदार प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत नाहुली येथे लवकरच शेतकरी कर्जवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात नाहुली गावासह परिसरातील पात्र शेतकऱ्यांना कर्जाचे चेक वितरित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!