पवित्र पोर्टलद्वारे मुलाखतीशिवाय शिक्षक पदांसाठी शिफारसी, ३०,२०९ पदांची भरती प्रक्रिया
पवित्र पोर्टल मार्फत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, अदिवासी विकास विभागाच्या शासकीय शाळा महापालिका, नगरपालिका शासकीय विद्यानिकेतन तसेच खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक भरती करण्यात येत आहे या भरती प्रक्रियेत मुलाखतीशिवाय १३,११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील शिक्षक भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेंतर्गत पवित्र पोर्टलद्वारे मुलाखतीशिवाय १३ हजार ११९ उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया एकूण ३० हजार २०९ पदांसाठी राबविण्यात येत आहे. त्यापैकी मुलाखतीशिवाय भरतीसाठी १९ हजार ७५४ जागा उपलब्ध होत्या. या जागांपैकी आतापर्यंत १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.
इयत्तानिहाय किती उमेदवारांची शिफारस?
पवित्र पोर्टलवर जाहीर झालेल्या निवड यादीमध्ये विविध इयत्तांसाठी पुढीलप्रमाणे उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे— पहिली ते पाचवी : ७,५४१ पदे सहावी ते आठवी : ४,२०७ पदे नववी ते दहावी : १,११९ पदे अकरावी ते बारावी : २५२ पदे अशा प्रकारे एकूण १३,११९ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.
उर्वरित जागांसाठीही उमेदवारांना अपेक्षा शिक्षक भरतीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून एकूण ३०,२०९ पदांपैकी मोठ्या संख्येने पदे भरणे बाकी आहे. त्यामुळे पुढील टप्प्यात उर्वरित रिक्त पदांसाठी निवड प्रक्रिया कधी जाहीर होते, याकडे राज्यातील शिक्षक पदाच्या इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणाऱ्या या भरती प्रक्रियेमुळे पारदर्शक पद्धतीने शिक्षकांची निवड होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.१३,११९ उमेदवारांच्या शिफारसीमुळे शिक्षक भरती प्रक्रियेला आता वेग आल्याचे चित्र आहे.