पत्रकार सुशील थोरात यांच्यावरील हल्ल्याचा जामखेड तालुक्यातील पत्रकारांकडून तीव्र निषेध हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी, तहसीलदार कार्यालय व पोलीस ठाण्यात निवेदन
पत्रकार सुशील थोरात यांच्यावरील हल्ल्याचा जामखेड तालुक्यातील पत्रकारांकडून तीव्र निषेध
हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी, तहसीलदार कार्यालय व पोलीस ठाण्यात निवेदन
अहिल्यानगर शहरातील साम वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी पत्रकार सुशील थोरात यांच्यावर गुरुवारी (२० ऑगस्ट) झालेल्या भ्याड हल्ल्याचा जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. या हल्ल्यात सुशील थोरात गंभीर जखमी झाले असून, हल्लेखोरांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकारांनी केली.
या संदर्भात जामखेड तहसीलदार कार्यालयात पुरवठा अधिकारी जालिंदर कदम तसेच जामखेड पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक वर्षा जाधव यांना पत्रकारांच्या वतीने निवेदन देण्यात आले.पत्रकारांवरील हल्ल्यांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने आणि पोलिसांनी कठोर भूमिका घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष नासीर पठाण, जामखेड मीडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, ज्येष्ठ पत्रकार अशोक निमोणकर, संजय वारभोग, पप्पू सय्यद, किरण रेडे, अजय अवसरे, अविनाश बोधले, निलेश वनारसे, नासीर चाचू, मयुर भोसले यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.
यावेळी बोलताना पत्रकार संघाचे अध्यक्ष नासीर पठाण म्हणाले, “पत्रकार सुशील थोरात यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत गंभीर आहे. पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत हल्लेखोर आरोपींवर कठोर कारवाई करून पत्रकारांना सुरक्षित वातावरण मिळेल, असा स्पष्ट संदेश प्रशासनाने द्यावा.”
सुदाम वराट म्हणाले, “पत्रकार सुशील थोरात यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा जामखेड तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत. पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. पत्रकार निर्भयपणे काम करू शकतील, यासाठी प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलावीत.”
संजय वारभोग यांनी सांगितले की, “पत्रकारांवर हल्ला करण्याचे धाडस पुन्हा कोणी करणार नाही, अशी कठोर कारवाई या प्रकरणातील आरोपींवर झाली पाहिजे. पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने घेण्याची गरज आहे.”
किरण रेडे म्हणाले, “पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. समाजातील प्रश्न प्रशासन आणि जनतेसमोर मांडण्याचे काम पत्रकार करतात. अशा पत्रकारावरच हल्ला होत असेल तर ही गंभीर बाब आहे. त्यामुळे हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी.”
सुशील थोरात यांच्यावरील हल्ल्याची सखोल चौकशी करून सर्व संबंधित आरोपींना तातडीने ताब्यात घ्यावे आणि पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी जामखेड तालुक्यातील पत्रकारांनी निवेदनाद्वारे केली आहे.