पत्रकार सुशील थोरात यांच्यावरील हल्ल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडवर,
जामखेड तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने हल्लेखोरांचा जाहिर निषेध
अहिल्यानगर शहरातील साम वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी सुशील थोरात यांच्यावर गुरुवारी (२० ऑगस्ट) सायंकाळी वाहनाच्या धक्क्यावरून झालेल्या वादानंतर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत थोरात जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्याची बातमी कळताच जामखेड तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने हल्लेखोरांचा जाहीर निषेध करण्यात आला.
जामखेड पत्रकार संघ, जामखेड मिडिया क्लब, मराठी पत्रकार संघ जामखेड, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला असून उद्या दुपारी पत्रकारांच्या वतीने तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन हल्लेखोरांना कडक शिक्षा करण्यात यावी असे निवेदन देण्यात येणार आहे. अशी माहिती जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष नासीर पठाण व मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट यांनी दिली.
प्राथमिक माहितीनुसार, १० ते १२ जणांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे आणि तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा रुग्णालयात दाखल झाला. पोलिसांनी घटनेची माहिती घेत हल्ल्याचे नेमके कारण आणि सहभागी व्यक्तींबाबत तपास सुरू केला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, वाहनाला धक्का लागल्याच्या कारणावरून थोरात यांचा काही व्यक्तींशी वाद झाला. त्यानंतर या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. घटनेनंतर परिसरात काही काळ खळबळ उडाली.
दरम्यान, पोलिसांकडून घटनाक्रमाची माहिती घेतली जात असून संबंधित व्यक्तींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे वृत्त आहे.
पत्रकारावर झालेल्या हल्ल्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने तपास सुरू केल्याने पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.