Monday, August 17, 2026
Home ताज्या बातम्या जामखेडमध्ये श्रीनागेश्वर पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न टाळ-मृदुंगाचा गजर,...

जामखेडमध्ये श्रीनागेश्वर पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न टाळ-मृदुंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष अन् महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने पालखीचे स्वागत, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

0
2
जामखेडमध्ये श्रीनागेश्वर पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न   टाळ-मृदुंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष अन् महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने पालखीचे स्वागत, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

जामखेड न्युज – – – – – 

जामखेडमध्ये श्रीनागेश्वर पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न

टाळ-मृदुंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष अन् महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने पालखीचे स्वागत, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

जामखेडचे ग्रामदैवत श्रीनागेश्वर महाराज यांच्या नागपंचमी यात्रेनिमित्त आयोजित श्रीनागेश्वर पालखी सोहळा सोमवारी भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला. टाळ-मृदुंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष, भजनी मंडळांची भक्तिगीते आणि वारकरी परंपरेनुसार निघालेल्या पालखी मिरवणुकीमुळे संपूर्ण जामखेड शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. यंदाच्या सोहळ्यात महिलांची लक्षणीय उपस्थिती राहिली.

गेल्या २३ वर्षांपासून नागपंचमीच्या निमित्ताने श्रीनागेश्वर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. सोमवारी सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सकाळी श्री शिवलीलामृत पारायणाचे आयोजन करण्यात आले. प्रातःकाळी यजमान जामखेडच्या नगराध्यक्षा प्रांजलताई अमित चिंतामणी व अमित शेठ चिंतामणी तसेच गोवर्धन जोरे व मंगलाताई जोरे यांच्या हस्ते भगवान श्रीनागेश्वर महाराजांची विधिवत पूजा करण्यात आली.

यानंतर पंचक्रोशीतील विविध भजनी मंडळांनी मंदिरासमोर भजनसेवा सुरू केली. विठोबा-रखुमाईच्या भजनानंतर यजमानांच्या हस्ते पालखीमध्ये श्रीनागेश्वर महाराजांच्या मुखवट्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. महादेवाचा अभंग घेत पालखीचे प्रस्थान झाले. ‘हर हर महादेव’, ‘ॐ नमः शिवाय’, ‘नागेश्वराय शिव नागेश्वराय’ तसेच ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
शहरातून निघाली भव्य पालखी मिरवणूक श्रीनागेश्वर मंदिरापासून सुरू झालेली पालखी मिरवणूक श्रीनागेश्वर महाद्वार, खर्डा रस्ता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक, लक्ष्मी चौक, संविधान चौक, श्रीविठ्ठल मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज पेठ, शनी मारुती मंदिर, जयहिंद चौक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग, जुने कोर्ट, महादेव गल्लीमार्गे वैतरणा नदी तीर आणि नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पालखी मार्गावरून पुन्हा श्रीनागेश्वर मंदिरात पोहोचली.
दिंडी कीर्तन मंडपात पोहोचल्यानंतर अभंग व आरती करण्यात आली. विठ्ठल भजनी मंडळ, श्रीनागेश्वर भजनी मंडळ, तपनेश्वर भजनी मंडळ, जमादारवाडी भजनी मंडळ, संत वामनभाऊ महाराज वारकरी शिक्षण संस्था, जगदाळे वस्ती, बोराटे वस्ती, बटेवाडी यांसह पंचक्रोशीतील विविध भजनी मंडळांनी सहभाग घेतला.

पालखी मार्गावर महिलांनी सडा-रांगोळ्या काढून स्वागत केले होते. शहरातील विविध ठिकाणी भाविकांनी पालखी दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यामुळे संपूर्ण जामखेड शहरात दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

मान्यवरांची उपस्थिती
पालखी सोहळ्यास नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, मनसे नेते प्रदीप टाफरे, अमित चिंतामणी, बांधकाम समितीचे सभापती तथा नगरसेवक मोहन पवार, नगरसेवक संजय काशिद, राजेंद्र गोरे, प्रशांत राळेभात, पवन राळेभात, दिगंबर चव्हाण, मनोज कुलकर्णी, प्रवीण चोरडिया, बजरंग डूचे, सचिन शिंदे, अमोल लोहकरे, शिवकुमार डोंगरे, ॲड. महारुद्र नागरगोजे, राजेंद्र जाधव, प्रा. ज्ञानदेव कुंभार, गणेश डोंगरे, संजीवन मेंढकर तसेच भजनी मंडळाचे पंढरीनाथ महाराज राजगुरू, हरिदास गुंड, जगन्नाथ धर्माधिकारी, संतोष पाटील आदी उपस्थित होते.

सेवा मंडळाचे अहोरात्र परिश्रम
पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी श्रीनागेश्वर सेवा मंडळाचे बाबासाहेब खराडे, बबलू देशमुख, मिलिंद ब्रह्मे, संतोष बारगजे, विनायक राऊत, शंकर राऊत, प्रवीण राऊत, आनंद राजगुरू, दिलीपकुमार राजगुरू, नागेश पानसाडे, सीताराम राळेभात, उमेश देशमुख, राजेंद्र देशपांडे, दत्तात्रय काळे, सत्येंद्र पाटील, शाम क्षीरसागर, किरण सोनवणे, नंदू शिंदे, दर्शन भोसले, आदित्य पोकळे, ओम भोसले, कृष्णा मिसाळ, रोहित खवळे, रोहन बांदल, सुमित बकरे, आर्यन धनवडे, ओम काकडे, अक्षय राळेभात, रोहित शिंदे, रोहित कोल्हे, सचिन म्हेत्रे, रोहित पोकळे, विजय राजकर, सचिन अटकरे, सुयश हजारे, ओम घुले, बंडू मेहत्रे, मारुती झगडे, भागवत गवळी यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वर चरित्रकथा

पालखी सोहळ्यानिमित्त संत वामनभाऊ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५१व्या जन्मोत्सवी वर्षानिमित्त संत ज्ञानेश्वर माऊली संगीतमय चरित्रकथेचे विशेष आयोजन करण्यात आले आहे.
श्रीक्षेत्र तेर (गोरोबा काकांचे) येथील सकल संत चरित्र व श्रीराम कथा प्रवक्ते ह.भ.प. दीपकजी महाराज यांच्या रसाळ वाणीतून ही चरित्रकथा सुरू असून, हजारो भाविक कथा श्रवणाचा लाभ घेत आहेत.
बुधवार, दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. चेतन महाराज बोरसे, मालेगाव यांचे काल्याचे कीर्तन होणार असून, त्यानंतर महाप्रसादाने संपूर्ण उत्सवाची सांगता होणार आहे.

मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने पालखीचे स्वागत

श्रीनागेश्वर पालखी सोहळ्यादरम्यान मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने पालखीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. पालखी सोहळ्याचे विणेकरी ह.भ.प. संतोष महाराज बारगजे यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष अझहरभाई काझी, उपाध्यक्ष हाजी मंजुरअली सय्यद, सचिव आबेद खान, सहसचिव इस्माईल सय्यद, खजिनदार हाजी मुख्तार सय्यद, सल्लागार नाझीम काझी, हाजी जावेद बागवान, इस्माईल टेलर, इम्रान कुरेशी यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मुस्लिम पंच कमिटीने केलेल्या या स्वागतामुळे जामखेडच्या सामाजिक सलोख्याची आणि राष्ट्रीय एकात्मतेची सुंदर प्रचिती पाहायला मिळाली.
दैनंदिन कार्यक्रम
अखंड हरिनाम सप्ताहात पहाटे काकडा, सकाळी ८.३० ते १० या वेळेत श्री शिवलीलामृत पारायण, सकाळी १० ते १२ गाथा भजन, दुपारी ३ ते ४.३० कीर्तन, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ आणि सायंकाळी ६ ते ९ संत ज्ञानेश्वर माऊली संगीतमय चरित्रकथा, त्यानंतर भोजन असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीनागेश्वर पालखी सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह व श्रीनागेश्वर सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!