Sunday, August 16, 2026
Home ताज्या बातम्या साकत ग्रामसभेत गोंधळ, नागरिकांच्या प्रश्नांना ग्रामसेवकांकडून समाधानकारक उत्तरे नाहीत

साकत ग्रामसभेत गोंधळ, नागरिकांच्या प्रश्नांना ग्रामसेवकांकडून समाधानकारक उत्तरे नाहीत

0
2
साकत ग्रामसभेत गोंधळ, नागरिकांच्या प्रश्नांना ग्रामसेवकांकडून समाधानकारक उत्तरे नाहीत

जामखेड न्युज – – – – – 

साकत ग्रामसभेत गोंधळ, नागरिकांच्या प्रश्नांना ग्रामसेवकांकडून समाधानकारक उत्तरे नाहीत

स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी साकत ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत नागरिकांनी विविध विकासकामे, निधीचा वापर आणि ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित केल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना ग्रामसेवकांकडे आवश्यक दप्तर व कागदपत्रे उपलब्ध नसल्याने समाधानकारक उत्तरे देता आली नसल्याचा आरोप उपस्थित नागरिकांनी केला.

ग्रामसभेत गावात आलेला निधी किती, कोणत्या योजनांसाठी किती निधी प्राप्त झाला, कोणत्या कामावर किती खर्च करण्यात आला, कोणत्या हेडखाली किती रक्कम खर्च झाली, तसेच विविध विकासकामांची सद्यस्थिती काय आहे, याबाबत नागरिकांनी माहिती मागितली. मात्र, संबंधित नोंदी व कागदपत्रे उपलब्ध नसल्याने ग्रामसेवकांना अनेक प्रश्नांची ठोस माहिती देता आली नाही, असा नागरिकांचा आरोप आहे.

विशेष म्हणजे ग्रामसभेचे प्रोसिडिंगसह आवश्यक कागदपत्रे घेऊन न आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. प्रश्नांना समाधानकारक माहिती देण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली आणि अखेरीस कोऱ्या कागदावर ग्रामसभा संपविण्यात आल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. त्यामुळे ग्रामसभेच्या कार्यपद्धतीवर उपस्थितांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

ग्रामसभेच्या अध्यक्ष सरपंच मनीषा सर्जेराव पाटील या ग्रामसभा सुरू असतानाच निघून गेल्याचेही उपस्थित नागरिकांनी सांगितले. त्यामुळे ग्रामसभेतील चर्चेला पूर्णविराम मिळण्यापूर्वीच अध्यक्ष निघून गेल्याने नागरिकांमध्ये अधिक नाराजी निर्माण झाली. असे माजी सरपंच कांतीलाल वराट यांनी सांगितले.

सध्या ग्रामपंचायतीवर प्रशासकीय व्यवस्था असल्याने नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या कारभारातील पारदर्शकतेसाठी आवश्यक सर्व कागदपत्रांसह पुन्हा ग्रामसभा आयोजित करावी, अशी मागणी केली आहे. गावातील निधी, विकासकामे, खर्च आणि ग्रामपंचायतीच्या विविध निर्णयांची माहिती नागरिकांसमोर स्पष्टपणे मांडावी, अशीही मागणी करण्यात आली.

या ग्रामसभेला ग्रामसेवक शिंदे, सरपंच मनीषा सर्जेराव पाटील, माजी सरपंच कांतीलाल वराट, पोलीस पाटील महादेव वराट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती कैलास वराट, उपसरपंच राजाभाऊ वराट, माजी सरपंच सदाशिव वराट, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची अधिकृत उत्तरे व ग्रामपंचायतीची बाजू याबाबत संबंधित प्रशासनाचे स्पष्टीकरण मिळाल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!