नागपंचमीला जामखेडमध्ये रंगणार कुस्त्यांचा थरार, सलग २४ व्या वर्षी भव्य निकाली कुस्त्यांचे मैदान
जामखेडची नागपंचमी यात्रा महाराष्ट्रासह राज्यभरात प्रसिद्ध असून, दरवर्षी हजारो भाविक आणि कुस्तीशौकीन या यात्रेला आवर्जून उपस्थित राहतात. नागपंचमी यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या भव्य निकाली कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन यंदाही कै. विष्णू उस्ताद काशीद प्रतिष्ठानच्या वतीने सलग २४व्या वर्षी करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या नागपंचमी यात्रेत कुस्तीप्रेमींना नामांकित पैलवानांच्या चुरशीच्या लढतींचा थरार अनुभवता येणार आहे.
मराठा गौरव युवराजभाऊ काशीद व उपमहाराष्ट्र केसरी बबन काका काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ॲड. अजय काशीद यांच्या नियोजनातून या कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध राज्यांमधील नामांकित पैलवान या मैदानात सहभागी होत असल्याने जामखेडच्या कुस्ती मैदानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
१८ ऑगस्टला जामखेड महाविद्यालयात मैदान नागपंचमी यात्रेनिमित्त दि. १८ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता जामखेड महाविद्यालय, जामखेड येथे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती नामदार प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य निकाली कुस्त्यांचे मैदान रंगणार आहे. यापूर्वी दुपारी १२ वाजता जामखेड येथील शनी मंदिरातून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण मराठा गौरव युवराजभाऊ काशीद, मराठी भाषीय संघ अध्यक्ष, मध्यप्रदेश यांची उपस्थिती असणार आहे.
पहिल्या पाच मानाच्या कुस्त्या ठरल्या मैदानातील पहिली मानाची कुस्ती पै. रविराज चव्हाण, आंतरराष्ट्रीय आखाडा पुणे विरुद्ध महारुद्र कालेज, कुर्डुवाडी यांच्यात होणार आहे. दुसरी कुस्ती पै. मोईन पटेल, कुर्डुवाडी विरुद्ध मुसा पहलवान, महापौर केसरी इंदोर यांच्यात रंगणार आहे.
तिसऱ्या कुस्तीत रोहित दैया, शाहू कुस्ती केंद्र विरुद्ध पै. शाहरुख खान, पुणे, चौथ्या कुस्तीत सौरभ गाडे, पाटोदा विरुद्ध तात्या घुले, कोल्हापूर, तर पाचव्या कुस्तीत पृथ्वीराज वनवे, शंभूराजे कुस्ती संकुल, जामखेड विरुद्ध अमोल दिंडे चाऊस, आष्टी यांच्यात लढत होणार आहे.
ऐनवेळी अतिरिक्त कुस्ती नाही यंदाच्या मैदानाचे नियोजन करताना निश्चित करण्यात आलेल्या कुस्त्यांनाच प्राधान्य देण्यात आले असून, त्याव्यतिरिक्त ऐनवेळी कोणतीही अतिरिक्त कुस्ती लावली जाणार नसल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातील पैलवानांसोबतच बाहेरील राज्यांतील नामांकित कुस्तीपटू या मैदानात सहभागी होणे हे जामखेडच्या कुस्ती मैदानाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. गेल्या अनेक वर्षांत या मैदानावर अनेक नामांकित कुस्तीपटूंनी आपल्या कुस्ती कौशल्याचे दर्शन घडविले आहे. त्यामुळे दरवर्षी नागपंचमीच्या या कुस्ती मैदानाकडे जिल्ह्यासह राज्यातील कुस्तीप्रेमींचे विशेष लक्ष असते.
तरुणांना क्रीडाक्षेत्राकडे वळविण्याचा प्रयत्न जामखेडसारख्या ग्रामीण भागातील कुस्तीपटू आणि तरुणांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम ॲड. अजय काशीद यांच्या माध्यमातून केले जात आहे. आजच्या काळात तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून क्रीडा क्षेत्राकडे वळावे, यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे. कुस्तीच्या माध्यमातून तरुणांना शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच शिस्त, मेहनत आणि सकारात्मक विचारांची दिशा मिळते.
कै. विष्णू उस्ताद काशीद प्रतिष्ठानच्या माध्यमातून कुस्ती मैदानासोबतच विविध सामाजिक उपक्रमही वेळोवेळी राबविले जातात. क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील या उपक्रमांमुळे ॲड. अजय काशीद यांची परिसरात वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
यंदाही जामखेडसह परिसरातील तसेच जिल्ह्यातील मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमींनी या भव्य निकाली कुस्त्यांच्या मैदानाला उपस्थित राहून कुस्तीचा थरार अनुभवावा, असे आवाहन ॲड. अजय काशीद, काशीद परिवार आणि अजय काशीद मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.