जामखेडमध्ये देहदान अभियानाला बळ, ५११ वा देहदान फॉर्म
शहाजी डोके यांचा मरणोत्तर देहदानाचा संकल्प, सामाजिक जनजागृतीला उत्स्फूर्त प्रतिसाद
जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन व कोठारी प्रतिष्ठान, जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या अवयवदान–देहदान–नेत्रदान अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत भुतवडा (ता. जामखेड) येथील व सध्या जामखेड-पुणे येथे वास्तव्यास असलेले शहाजी तुळशीराम डोके (वय ७६) यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प करत फॉर्म भरला. त्यामुळे या अभियानातील हा ५११ वा देहदान फॉर्म ठरला आहे.
जामखेड येथील कोठारी प्रतिष्ठानच्या कार्यालयात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात डोके यांनी देहदानाचा संकल्प केला. त्यांनी पुणे येथील श्री शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये १९७७ ते २००८ या कालावधीत सुमारे ३० वर्षे इंग्रजी विषयाचे अध्यापन केले. त्यानंतर त्यांनी सुपरवायझर म्हणूनही काम केले व सेवानिवृत्ती घेतली.
सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक कार्याशी त्यांचा सक्रिय संबंध राहिला आहे. मराठा सेवा संघ पुणे शहर अध्यक्ष, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुणे शहर अध्यक्ष, विपश्यना धम्मसेवक तसेच बामसेफ कार्यकर्ता म्हणून त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांत सहभाग घेतला आहे.
यावेळी बोलताना शहाजी डोके म्हणाले, “माणूस मेल्यानंतर त्याची राख होण्यापेक्षा देह दुसऱ्यांच्या कामी यावा. माझ्या देहापासून अनेक डॉक्टर घडतील आणि हजारो लोकांचे प्राण वाचतील, याचे समाधान मला आहे. माझ्या घरच्यांच्या संमतीने मी हा फॉर्म भरला आहे.” यावेळी प्रा. धनंजय भोसले यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या देहदान, नेत्रदान व अपघातग्रस्तांना मदत करण्याच्या कार्याचे कौतुक केले. “डोके यांचा देहदानाचा संकल्प समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे,” असे त्यांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी सांगितले की, “आत्तापर्यंत ५११ नागरिकांचे मरणोत्तर देहदानाचे फॉर्म भरून घेतले असून, त्यापैकी २७ जणांचे अवयवदान व नेत्रदान पूर्ण झाले आहे.” या सामाजिक उपक्रमाला डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे चेअरमन व राज्याचे जलसंधारण मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, मेडिकल डायरेक्टर डॉ. अभिजीत दिवटे, अधिष्ठाता डॉ. सुनील म्हस्के आणि शरीर रचना विभागप्रमुख डॉ. सुधीर पवार यांचे सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी सांगितले. या अभियानामुळे जामखेडसह परिसरात ‘देहदान हीच खरी दानशूरता’ हा संदेश पोहोचत असून, अधिकाधिक नागरिक देहदान, अवयवदान व नेत्रदानासाठी पुढे येत आहेत. शहाजी डोके यांचा ५११ वा देहदानाचा संकल्प या जनजागृती अभियानाला आणखी बळ देणारा ठरला आहे.