Saturday, July 25, 2026
Home ताज्या बातम्या अनेक वर्षांपासून प्रलंबित लोणी–शिव ते वाकी रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने

अनेक वर्षांपासून प्रलंबित लोणी–शिव ते वाकी रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने

0
2

जामखेड न्युज – – – – – 

अनेक वर्षांपासून प्रलंबित लोणी–शिव ते वाकी रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने

जामखेड तालुक्यातील लोणी येथील शिव ते वाकी या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या प्रश्नावर अखेर सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. या रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाबाबत ग्रामपंचायतीमार्फत दि. १ जुलै २०२६ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार अर्ज देण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष पाहणीसाठी गावात दाखल झाले.

या पाठपुराव्यासाठी माजी पोलीस उपअधीक्षक संजय लोहकरे , दिलीप धावडे, काकासाहेब शेळके, तुळशीराम आण्णा, सरपंच तसेच गावातील ज्येष्ठ नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी सातत्याने संपर्क ठेवला. त्यानुसार विभागाचे आवटी साहेब यांनी आज लोणी येथे येऊन रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी गावातील हनुमान मंदिरासमोर ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या प्रारंभी गावाच्या वतीने सरपंचांच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सरपंचांचाही उपस्थित ग्रामस्थांनी सन्मान केला.

बैठकीत ग्रामस्थांनी रस्त्यावरील अतिक्रमण, वाहतुकीच्या अडचणी, अपघातांची शक्यता आणि रस्त्याच्या दुरवस्थेबाबत आपली मते मांडली. सविस्तर चर्चेनंतर अधिकारी, सरपंच व ग्रामस्थांनी संपूर्ण रस्त्याची पाहणी केली. पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी रस्त्यावर अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्त्याचा भाग नांगरल्याचे, तर काही ठिकाणी धोकादायक वळणे व रस्त्यालगत असलेल्या झाडांमुळे अपघात होण्याचा धोका असल्याचे अधिकाऱ्यांनी नोंदविले. सर्व ठिकाणांचे छायाचित्रण करून अहवाल तयार करण्यात आला.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित बाबी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देत तातडीची आवश्यक कामे लवकरात लवकर हाती घेतली जातील, तसेच पुढील कार्यवाहीबाबतची तारीख ग्रामस्थांना कळविण्यात येईल, असे आश्वासन दिले.

या बैठकीस गावचे सरपंच, अप्पा गोरे, अप्पा पवार, नानासाहेब शेळके, दत्तात्रय सावंत, दीपक सावंत, अण्णासाहेब सावंत, हुसेनभाई, दिलीप घाडगे, पिंटू लोहकरे, सुरेश कुलकर्णी, आबा काका कुलकर्णी, बाबासाहेब धावडे, बाबासाहेब शेळके, माऊली जाधव, महावीर धावडे, सतीश जगताप, बाळू भिमाखाडे, नारायण धावडे, शरद वायकर, लक्ष्मण चोरमले, प्रकाश जाधव, बाळू ढगे, वैजनाथ सावंत, भास्कर धावडे, प्रमोद निंबाळकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

बैठक शांततेत व सकारात्मक वातावरणात पार पडली.
रस्त्यावरील अतिक्रमण हटवून दुरुस्तीचे काम तातडीने सुरू व्हावे, अशी ग्रामस्थांची अपेक्षा असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!