Monday, September 14, 2026
Home ताज्या बातम्या जामखेडमध्ये जरांगे पाटलांच्या स्वागताची जय्यत तयारी! चौकाचौकात भव्य स्वागत कमानी अन्...

जामखेडमध्ये जरांगे पाटलांच्या स्वागताची जय्यत तयारी! चौकाचौकात भव्य स्वागत कमानी अन् बॅनर, अन्न-पाण्याच्या व्यवस्थेसह गावोगावी नियोजन बैठका, सकल मराठा समाज सज्ज

0
2
जामखेडमध्ये जरांगे पाटलांच्या स्वागताची जय्यत तयारी!  चौकाचौकात भव्य स्वागत कमानी अन् बॅनर, अन्न-पाण्याच्या व्यवस्थेसह गावोगावी नियोजन बैठका, सकल मराठा समाज सज्ज

जामखेड न्युज – – – – – 

जामखेडमध्ये जरांगे पाटलांच्या स्वागताची जय्यत तयारी!

चौकाचौकात भव्य स्वागत कमानी अन् बॅनर, अन्न-पाण्याच्या व्यवस्थेसह गावोगावी नियोजन बैठका, सकल मराठा समाज सज्ज

 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षाची भूमिका कायम ठेवणारे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. १९ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर १६ सप्टेंबर रोजी त्यांचा जामखेडमार्गे मुंबईकडे प्रवास होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी जामखेड शहरासह तालुक्यातील सकल मराठा समाजाने जोरदार तयारी सुरू केली असून, शहरातील चौकाचौकात भव्य स्वागत कमानी आणि मोठमोठे बॅनर उभारण्यात येणार आहेत.

जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी तालुक्यातील विविध गावांमध्ये नियोजन बैठका घेण्यात येत असून, त्यांच्या मार्गावरील ठिकाणी पिण्याचे पाणी, बिस्किटे, नाश्ता तसेच खाद्यपदार्थांचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे १६ सप्टेंबर रोजी जामखेड शहर व तालुक्यात मराठा बांधवांच्या उपस्थितीने वातावरण भगवेमय होण्याची शक्यता आहे.

मोहा फाट्यापासून स्वागताचा जल्लोष
मनोज जरांगे पाटील हे १५ सप्टेंबर रोजी रात्री बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे मुक्कामी राहणार असून, १६ सप्टेंबर रोजी सकाळी जामखेडमार्गे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.

त्यांच्या स्वागतासाठी मोहा, रेडेवाडी व परिसरातील गावांच्या वतीने मोहा फाटा येथे भव्य स्वागत कमान उभारण्यात येणार आहे. त्यानंतर साकत फाटा येथे धोत्री, सावरगाव, साकत तसेच परिसरातील मराठा बांधवांकडून स्वागत करण्यात येणार आहे. रॅलीत सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी पाणी बॉटल, बिस्किटे, नाश्ता व खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जामखेड शहरातील चौकाचौकात स्वागत
जरांगे पाटील यांचे जामखेड शहरात आगमन झाल्यानंतर विविध प्रमुख चौकांमध्ये मराठा बांधवांकडून त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. यामध्ये मार्केट कमिटी, विश्वक्रांती चौक, बीड कॉर्नर, जयहिंद चौक, खर्डा चौक, शंभुराजे कुस्ती संकुल, पंचायत समिती कार्यालयासमोर, एस.टी. बसस्थानक, नगर रोड, पंचदेवालय चौक तसेच पाटोदा-अरणगाव या ठिकाणांचा समावेश आहे.

शहरातील प्रमुख चौकांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वागत कमानी आणि भव्य फलक उभारण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर जामखेड शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गावोगावी बैठका; नियोजनाला वेग
जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी तालुक्यातील विविध गावांमध्ये बैठका घेऊन जबाबदाऱ्या निश्चित केल्या जात आहेत. स्वागत कमानी, फलक, अन्न-पाणी व्यवस्था, वाहनांचे नियोजन आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मराठा बांधवांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत चर्चा केली जात आहे.

रविवारी झालेल्या नियोजन बैठकीस जामखेड तालुक्यातील विविध गावांमधील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण तालुक्यातील सकल मराठा समाज एकवटून स्वागताची तयारी करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मराठा बांधवांसाठी अन्न-पाण्याची व्यवस्था
मुंबईकडे जाणाऱ्या मराठा बांधवांना प्रवासादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी विविध ठिकाणी पिण्याचे पाणी, बिस्किटे, नाश्ता व खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात येणार आहे. या व्यवस्थेसाठी नागरिक आणि विविध गावांतील कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने पुढे येत आहेत.त्यामुळे १६ सप्टेंबर रोजी जामखेडमार्गे मुंबईकडे जाणाऱ्या मराठा बांधवांच्या स्वागतासाठी जामखेड शहर आणि तालुका सज्ज होत असल्याचे चित्र आहे.

चौकट

मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन
मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी तसेच मुंबईकडे जाणाऱ्या मराठा बांधवांसाठी ज्या नागरिकांना पाणी, खाद्यपदार्थ किंवा अन्य कोणत्याही स्वरूपात मदत करायची असेल, त्यांनी अखंड मराठा समाज, जामखेडशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!