कागदपत्र नाही, चौकशी नाही, तरी परवानगी पक्की! – सामाजिक कार्यकर्ते गणेश भानवसे
जामखेड तालुक्यातील विविध कलाकेंद्रांच्या कारभारावर भारतीय भ्रष्टाचार निवारण समिती, दिल्लीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष गणेश भानवसे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. कलाकेंद्रे नियमानुसार चालत नसल्याचा आरोप करत संबंधित प्रकरणांची माहिती अधिकारातून माहिती मिळवून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
भानवसे म्हणाले की, महाराष्ट्रात सुमारे ७० ते ८० कलाकेंद्रे असल्याचे सांगितले जाते, त्यापैकी जामखेड तालुक्यात सुमारे ९ कलाकेंद्रे असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, यातील काही कलाकेंद्रांकडे आवश्यक कागदपत्रे, परवानग्या व इतर वैधानिक बाबींची पूर्तता आहे का, याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
‘कागदपत्रे अपुरी असताना परवानगी कशी?’ माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार एका कलाकेंद्राच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात कागदपत्रांची पूर्तता नसतानाही परवानगी देण्यात आल्याचा दावा भानवसे यांनी केला. संबंधित कलाकेंद्राकडे सुमारे ८० टक्के कागदपत्रांची कमतरता असताना केवळ २० टक्के कागदपत्रांच्या आधारे परवानगी कशी देण्यात आली?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.तसेच काही ठिकाणी बांधकाम परवाने व एन.ए. (नॉन-अॅग्रिकल्चरल) परवानगी नसताना कलाकेंद्रांना परवानगी कशी देण्यात आली, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
डीजेचा वापर, स्टेजचीही कमतरता? काही कलाकेंद्रांमध्ये नियमबाह्य पद्धतीने डीजेचा वापर केला जात असल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत करण्यात आला. काही ठिकाणी आवश्यक स्टेजची सुविधा नसल्याचेही भानवसे यांनी सांगितले. त्यामुळे संबंधित विभागांनी कलाकेंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करून नियमांची अंमलबजावणी होते की नाही, याची तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
मुलींवरील अन्याय-अत्याचाराच्या आरोपांची चौकशीची मागणी कलाकेंद्रांमध्ये काम करणाऱ्या काही मुलींवर अन्याय व अत्याचार होत असल्याच्या तक्रारी असल्याचा गंभीर आरोप भानवसे यांनी केला. या आरोपांची वस्तुनिष्ठ चौकशी करून संबंधित मुलींच्या सुरक्षिततेची आणि त्यांच्या हक्कांची काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही मुलीवर अन्याय होत असल्यास संबंधित यंत्रणेने तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
‘महाराष्ट्राची लोककला जपली पाहिजे’ महाराष्ट्राची पारंपरिक लोककला आणि सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी कलाकेंद्रांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे कलाकेंद्रांमध्ये महाराष्ट्रातील स्थानिक कलाकार व मुलींना योग्य संधी मिळावी, अशी भूमिका भानवसे यांनी मांडली. अनेक मुली बाहेरील राज्यांमधून येत असल्याचा दावा करत त्यांनी या बाबीचीही संबंधित प्रशासनाने तपासणी करावी, असे सांगितले.
कलाकेंद्रांमध्ये कार्यरत मुलींपैकी मोठ्या प्रमाणात मुली बाहेरील राज्यातील असल्याचा दावा करण्यात आला असून, याबाबतही अधिकृत आकडेवारी आणि नियम काय आहेत, याची प्रशासनाने स्पष्टता करावी, अशी मागणी करण्यात आली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार जामखेड तालुक्यातील कलाकेंद्रांबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार करण्यात येणार असल्याचे गणेश भानवसे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. कलाकेंद्रांना परवानगी देताना संबंधित विभागांनी कोणती कागदपत्रे तपासली, कोणत्या नियमांच्या आधारे परवानगी देण्यात आली आणि प्रत्यक्षात नियमांचे पालन होते का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी ते करणार आहेत.
दरम्यान, पत्रकार परिषदेत करण्यात आलेले आरोप हे संबंधित व्यक्तींचे दावे असून, त्याबाबत प्रशासन व संबंधित कलाकेंद्रांची अधिकृत बाजू समोर आल्यानंतरच संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.