अशोक पठाडे हल्लाप्रकरणी निष्पक्ष तपास व कठोर कारवाईची मागणी
जामखेड तालुक्यातील जवळा येथील ग्रामपंचायत सदस्य अशोक पठाडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी निष्पक्ष तपास करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात तहसीलदार तसेच जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात अशोक पठाडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला असून, या प्रकरणाचा सखोल व निष्पक्ष तपास करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत नागरिकांना न्याय मिळावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदन स्वीकारताना संबंधित अधिकाऱ्यांनी प्रकरणाचा कायदेशीर चौकटीत निष्पक्ष तपास करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, या प्रकरणातील तपासाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
शनिवार दि, ११ रोजी राजेवाडी येथील मातोश्री मंगल कार्यालयात विवाह समारंभादरम्यान सूत्रसंचालन करत असलेल्या ग्रामपंचायत सदस्य अशोक रामचंद्र पठाडे यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पठाडे यांच्या फिर्यादीवरून जवळा येथील रहिवासी तथा श्रीगोंदा तालुक्यात कार्यरत तलाठी शिवाजी सखाराम हजारे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 115(2), 118(1), 351(2) व 352 अन्वये जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, ज्येष्ठ नेते राजेंद्र कोठारी, नगरसेवक वसीम शेख, माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात, संतोष पवार, सागर कोल्हे, काकासाहेब कोल्हे, ज्ञानदेव ढवळे, चिराग आजबे, संदीप काढणे, संजय आव्हाड, प्रदीप धुमाळ, अमर चाऊस, किरण कोल्हे, अक्षय सुर्वे, राजू धुमाळ, हनुमंत मोहळकर, सागर शिंदे, अविराज शिरसाठ, सागर गंभीरे, श्रीकृष्ण गाडे, सुभाष धोत्रे, पप्पू मते, अविनाश पठाडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.