जामखेड तालुक्यात बियाणे वाटपात सावळा गोंधळ, १००० पेक्षा अधिक अर्जदार, पण मिळाले फक्त ९४ क्विंटल सोयाबीन!
खरीप हंगाम तोंडावर आला असताना जामखेड तालुक्यात महाडीबीटी पोर्टलद्वारे मोफत बियाणे वाटप योजनेत प्रचंड गोंधळ समोर आला आहे. तालुक्यात हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाण्यासाठी ऑनलाईन अर्ज केले होते, मात्र प्रत्यक्षात फक्त ९४ क्विंटल बियाणे प्राप्त झाले आहे. त्यामुळे शेकडो शेतकरी बियाण्यापासून वंचित राहणार आहेत.
येणाऱ्या बियाण्याची विदारक स्थिती
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या प्राप्त व अपेक्षित बियाणे साठा असा आहे: पीक प्रकार प्राप्त साठा शेतकऱ्यांची मागणी वस्तुस्थिती सोयाबीन ९४ क्विंटल आले अर्ज मात्र १०००+ अर्ज ९०% पेक्षा जास्त अर्जदार वंचित
भुईमूग६० क्विंटल मोठी मागणी अजून वाटप सुरू नाही. तूर मिनी किट १६ क्विंटल ८००+ अर्ज ५० शेतकऱ्यांनाही पुरणार नाही.
परमिट बंद: सोयाबीन बियाण्याचे ऑनलाईन परमिट जनरेट होणे बंद झाले आहे. त्यामुळे ज्यांना बियाणे मिळाले नाही त्यांना पुढील प्रक्रिया काय, हे कळेना. उडीद बियाणे गुलदस्त्यात शासनाने ६० रुपये प्रति किलो सबसिडी जाहीर करूनही उडीद बियाणे अद्याप तालुक्यात दाखलच झाले नाही.
वेळेत बियाणे नाही: पेरणीचे दिवस जवळ येऊनही बियाणे नसल्याने शेतकरी बाजारातून दुप्पट-तिप्पट दराने बियाणे घेण्यास मजबूर झाले आहेत.
शेतकऱ्यांचा आक्रोश : “याला म्हणतात सरकारी मदत?”
साकत येथील शेतकरी म्हणाले, “महाडीबीटीवर अर्ज केला, अंगठा दिला, ३ चकरा मारल्या. शेवटी सांगतात साठाच नाही आता ८५०० रुपये क्विंटलने खासगीतून सोयाबीन घ्यावे लागणार. सबसिडी फक्त टीव्हीवर दिसते.”
नान्नजच्या महिला शेतकरी म्हणाल्या, “तुरीचे ४ किलोचे किट मिळवण्यासाठी २ दिवस रांगेत उभे राहिलो. पण १६ क्विंटलमध्ये किती जणांना वाटणार? हे तर थट्टाच आहे.”
कृषी विभागाचे म्हणणे काय?
तालुका कृषी अधिकारी रवींद्र घुले म्हणाले, “वरून जितका साठा येतो तितकेच आम्ही वाटप करतो. मागणीच्या तुलनेत पुरवठा केवळ १०% आहे. सोयाबीनचे परमिट राज्यस्तरावरून बंद केले आहे. उडीद बियाण्याबाबत अजून सूचना नाहीत. आम्ही वरिष्ठांना कळवले आहे.”
लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांचे सवाल:
1. १००० अर्जांमागे ९४ क्विंटल हा कोणता न्याय? 2. ६० रु. सबसिडीचा जीआर*काढला, मग बियाणेच का नाही? 3. पेरणीच्या तोंडावर परमिट बंद करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावणे नाही का?
मागणी काय?
1. तातडीने अतिरिक्त बियाणे साठा जामखेड तालुक्यासाठी उपलब्ध करावा. 2. परमिट प्रक्रिया पुन्हा सुरू करून प्रलंबित अर्जदारांना बियाणे द्यावे. 3. उडीद, भुईमूग बियाणे तात्काळ वितरित करावे, अन्यथा सबसिडी DBT द्वारे थेट खात्यात जमा करावी. 4. मिनी किट ऐवजी २० किलोचे किट द्यावेत, कारण ४ किलोमध्ये एकरी पेरणीही होत नाही.
“बियाणे नाही, सबसिडी नाही, फक्त आश्वासने. सरकारने पिक-कर्जमाफीच्या अटी शिथिल कराव्यात, तसेच आधी बियाणे द्यावे, नाहीतर अन्नत्याग आम्हालाच करावा लागेल” – जामखेड तालुका शेतकरी संघटनेचा इशारा