Sunday, July 26, 2026
Home ताज्या बातम्या पन्हाळकर हॉस्पिटलच्या वतीने धाकटी पंढरीत हजारो भाविकांना फराळ वाटप आषाढी एकादशीनिमित्त दुसऱ्या...

पन्हाळकर हॉस्पिटलच्या वतीने धाकटी पंढरीत हजारो भाविकांना फराळ वाटप आषाढी एकादशीनिमित्त दुसऱ्या वर्षीही सेवाभावी उपक्रम, वारकरी संप्रदायाच्या सेवेत पन्हाळकर हॉस्पिटलचा सहभाग

0
2

जामखेड न्युज – – – – 

पन्हाळकर हॉस्पिटलच्या वतीने धाकटी पंढरीत हजारो भाविकांना फराळ वाटप
आषाढी एकादशीनिमित्त दुसऱ्या वर्षीही सेवाभावी उपक्रम,

वारकरी संप्रदायाच्या सेवेत पन्हाळकर हॉस्पिटलचा सहभाग

 

 

“बोलावा विठ्ठल… पाहावा विठ्ठल… करावा विठ्ठल जीवभाव…” या संतवाणीने दुमदुमलेल्या वातावरणात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि हरिनामाच्या अखंड गजरात जामखेड तालुक्यातील धनेगाव येथील धाकटी पंढरी येथे आषाढी एकादशीचा महोत्सव अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या हजारो वारकरी भाविकांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता.

शनिवारी (दि. २५) पहाटेपासूनच विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. विविध भागांतून आलेल्या पायी दिंड्यांच्या आगमनाने धाकटी पंढरी वारकरी संप्रदायाच्या भक्तिरंगात रंगून गेली. टाळ, मृदंग, वीणा, हरिपाठ आणि अभंगांच्या सुरांनी परिसर दुमदुमून गेला. महिला व पुरुष वारकऱ्यांनी पारंपरिक फुगड्या खेळत विठ्ठल नामाचा अखंड गजर केला. भक्ती, श्रद्धा आणि संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी हजारो भाविकांनी दिवसभर गर्दी केली.

या पवित्र सोहळ्याचे औचित्य साधत जामखेड येथील पन्हाळकर हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुशिल पन्हाळकर यांच्या वतीने धाकटी पंढरीत येणाऱ्या हजारो भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. सेवाभावातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वारकरी भाविकांनी या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक करत आयोजकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

विशेष म्हणजे, धाकटी पंढरी येथे भाविकांसाठी फराळ वाटप करण्याचा हा उपक्रम सलग दुसऱ्या वर्षी राबविण्यात आला. फराळ वाटप कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेखा विष्णुपंत पन्हाळकर, अतुल कडू, शुभम महादेव पोकळे, तुकाराम भोरे, अनी चव्हाण आणि विनोद डोके यांनी विशेष परिश्रम घेतले.

आषाढी एकादशी महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी धनेगाव ग्रामस्थ आणि मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी दोन दिवस अहोरात्र कार्यरत होते. भाविकांना पिण्याचे पाणी, भोजन, निवास आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. विशेष म्हणजे, राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या या सोहळ्यात विविध समाजघटकांसह मुस्लिम बांधवांनीही भाविकांचे स्वागत करून सेवाभावाची परंपरा जपली.

भक्ती, सेवा, समता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा धनेगाव येथील धाकटी पंढरीचा आषाढी एकादशी महोत्सव यंदाही मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाला. पन्हाळकर हॉस्पिटलच्या फराळ वाटप उपक्रमाने या सोहळ्यात सेवाभावाचा आणखी एक प्रेरणादायी अध्याय जोडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!