जामखेड न्युज – – – –
स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमतीचा पुन्हा भडका उडाला आहे. सिलिंडरच्या किमतीत बुधवारी २५ रुपयांनी वाढ करण्यात आली. गेल्या दोन महिन्यांतील ही दुसरी दरवाढ असून, जानेवारीपासून सिलिंडर १६५ रुपयांनी महाग झाला आहे. घरगुती गॅसच्या किमती दर महिन्यात वाढवून सरकारने त्यावरील अनुदान समाप्त केले. त्यामुळे करोनाकाळात उत्पन्न घटले असताना सामान्यांना महागाईची मोठी झळ बसत आहे. त्यामुळे विरोधक केंद्र सरकारवर टीका करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना टोला लगवाला आहे.
काँग्रेसची सत्ता असतांना सिलिंडरच्या किंमती ५० रुपयांनी वाढल्या होत्या. त्यावेळी भाजपाने देशभर आंदोलने केली होती. आता १६५ रुपयांनी किंमती वाढल्याने रोहित पवांरानी स्मृती इराणी यांचा आंदोलन करतांचा जूना फोटो शेअर त्यांना टोला लगावला आहे.
रोहित पवार म्हणाले, “स्मृती इराणीजी सिलिंडरच्या किंमती ५० रुपयांनी वाढल्या असताना आपण आणि आपल्या पक्षाने देशभर आंदोलनं केल्याचं आठवतंय. आता याच किंमती १६५ रुपयांनी भडकल्यात. महिला म्हणून आपण याबाबत संवेदनशील आहात. त्यामुळं आपण सरकारमध्ये असल्याने या किंमती कमी करण्यास सरकारला भाग पाडाल, अशी अपेक्षा आहे!”
जानेवारीपासून सिलिंडरच्या किमतीत १६५ रुपयांनी वाढ
नव्या दरवाढीमुळे, १४.५ किलोग्रॅम वजनाच्या अनुदानित सिलिंडरची किंमत मुंबईत ८५९.५०, तर दिल्लीत ८५९ रुपये होईल. कोलकाता व चेन्नईत याच किमती अनुक्रमे ८८६ रुपये व ८७५.५० रुपये होतील.
याआधी १ जुलैला सिलिंडरच्या किमतीत २५.५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. १ ऑगस्टला संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने, विरोधकांचा रोष टाळण्यासाठी गॅस सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या नाहीत, असे सूत्रांनी सांगितले. अनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीतील या ताज्या वाढीमुळे, १ जानेवारीपासून सिलिंडर एकूण १६५ रुपयांनी महाग झाला आहे.