जामखेड न्युज – – – – – –
समाजाने अंधश्रद्धा व भोंदू बाबांच्या आहारी न जाता सत्य संयम व मानवतेचा मार्ग स्वीकारावा – प्रवीण ऋषीजी महाराज
‘प्रथम दीक्षा’ कार्यक्रमानिमित्त जामखेडमध्ये पत्रकार परिषद

आज समाजाला अध्यात्माची गरज असून युवकांनी आधुनिकतेसोबत संस्कार आणि धर्माची जोड कायम ठेवावी. अंधश्रद्धा व भोंदू बाबांच्या आहारी न जाता सत्य संयम व माणवतेचा मार्ग स्वीकारावा असे आवाहन जैन समाजाचे उपाध्ये प्रमुख परम पूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांनी केले.

मंगळवार दिनांक १९ मे २०२६ रोजी जामखेड शहरात ‘प्रथम दीक्षा’ कार्यक्रमानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अहिंसा, सदाचार, संयम आणि अध्यात्मिक मूल्यांचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

प्रवीण ऋषीजी महाराज म्हणाले, जैन धर्म हा त्याग, तपश्चर्या, आत्मशुद्धी आणि अहिंसेचा संदेश देणारा धर्म आहे. दीक्षा घेण्यासाठी मनाची शुद्धता, त्यागाची भावना आणि कठोर आत्मअनुशासन आवश्यक असते. भगवान महावीरांनी दिलेला ‘जगा आणि जगू द्या’ हा संदेश आजच्या तणावपूर्ण वातावरणात अधिक महत्त्वाचा ठरत आहे.

समाजात वाढती हिंसा, व्यसनाधीनता आणि नैतिक अधःपतन रोखण्यासाठी युवकांनी सकारात्मक विचार आणि संस्कार स्वीकारणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष दिलीप गुगळे, उपाध्यक्ष महावीर बाफना, सचिव शरद शिंगवी, खजिनदार मंगेश बेदमुथ्था, संचालक जितेंद्र बोरा, आकाश बाफना, संजय गांधी, सचिन भंडारी, अमोल ताथेड, केतन चोपडा तसेच शिवकुमार डोंगरे आदींसह जैन समाजातील बांधव व पत्रकार उपस्थित होते.




