एक कोटी जनतेला दोन्ही डोस देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

0
226
जामखेड न्युज – – – 
कोरोनाविरुद्धच्या (Corona) लढाईत सुरू असलेल्या लसीकरणात (Vaccination) दोन्ही डोस (Dose) घेतलेल्या नागरिकांची संख्या महाराष्ट्रात (Maharashtra) एक कोटींवर पोचली आहे. लसीकरण मोहीम (Campaign) सुरू झाल्यापासून कोट्यवधी नागरिकांचे लसीकरण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. देशात ५५ कोटी ४७ लाख ३० हजार नागरिकांना किमान एक डोस देण्यात आला आहे. देशातील एकूण लोकसंख्येच्या ३२.४ टक्के लोकांना एक डोस देण्यात आला असून ९.१ टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. केरळमधील वायनाड, दीव-दमण, भुवनेश्वर व लडाख या चार शहरांनी १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य केले आहे. या चार ठिकाणच्या सर्वच्या सर्व नागरिकांनी किमान एक तरी डोस घेतला आहे.
दरम्यान, लसीकरण मोहिमेत काल एका दिवसात ८८ लाखांहून जास्त लोकांचे लसीकरण करण्यात आले व हादेखील विश्वविक्रम असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. लसीकरणाची सर्व सूत्रे केंद्राने हाती घेतल्यावर पहिल्या दिवशी म्हणजे यंदा २१ जून रोजी एकाच दिवसात ८० लाखांहून जास्त नागरिकांना लस टोचण्याचा विक्रम भारताने केला होता. तो काल मोडला गेला. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितले, की भारताने एका दिवसात ८८ लाख लसीकरणाचा विक्रम केला असून लसीकरणाचा वेग वाढल्याचे हे निदर्शक आहे. नवनवीन लसी येत जातील व दोन्ही भारतीय लसीचे उत्पादनही वाढेल तसा हा वेग आणखी वाढेल असाही त्यांनी विश्वास व्यक्त केला.आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंतच्या सर्वाधिक लसीकरणाबाबत उत्तर प्रदेश पहिल्या व महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशात आतापावेतो ५ कोटी ९८ लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. महाराष्ट्रात हीच संख्या ५ कोटी आहे. मात्र एकूण लोकसंख्या व लसीकरण यांचे गुणोत्तर लक्षात घेतले तर उत्तर प्रदेश लसीकरणात सर्वांत पिछाडीवर असलेल्या राज्यांत गणला जातो. कारण तेथील लोकसंख्येच्या प्रमाणात केवळ ३१ टक्के नागरिकांना किमान एक डोस दिला गेला आहे. महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, बिहार, पंजाब, झारखंड, तमिळनाडू ही मोठी राज्येही याबाबत उत्तर प्रदेशाच्या पुढे आहेत.दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या एक कोटींवर गेलेले महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य आहे.
हिमाचलमध्ये ७७ टक्के प्रौढांना किमान एक डोसहिमाचल प्रदेशात सर्वाधिक ७७ टक्के प्रौढ नागरिकांना किमान एका डोस दिला आहे. त्यापाठोपाठ जम्मू-कश्मीर ( ६६ टक्के), उत्तराखंड ( ६४), गुजरात (६०), मध्य प्रदेश (५५), कर्नाटक व केरळ (प्रत्येकी ५४ टक्के), राजस्थान ( ५२) व छत्तीसगड (५०) टक्के नागरिकांचे एक तरी डोसचे लसीकरण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here