जामखेड न्युज—–
जामखेडमध्ये डिजिटल जनगणना प्रशिक्षणास सुरूवात
तीन टप्प्यांत होणार प्रशिक्षण

भारतातील जनगणना ही जगातील सर्वात मोठ्या सांख्यिकीय उपक्रमांपैकी एक मानली जाते. १८७२ पासून सुरू झालेली ही परंपरा २०११ पर्यंत अखंडपणे पार पडली असून कोविड-१९ मुळे पुढे ढकलण्यात आलेली जनगणना-२०२७ आता नव्या डिजिटल स्वरूपात राबविण्यात येत आहे. २०२७ ची ही जनगणना १८७२ नंतरच्या मालिकेतील १६ वी व स्वातंत्र्यानंतरची ८ वी जनगणना असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जामखेडमध्ये जनगणना प्रशिक्षणास मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे.

जामखेडमध्ये तीन टप्प्यांत चार क्षेत्रीय प्रशिक्षकांच्या साहाय्याने 265 कर्मचारी, प्रगणक व पर्यवेक्षक प्रशिक्षण घेणार आहोत. सध्या पहिल्या टप्प्यात २७ एप्रिल ते २९ एप्रिल शंभर प्रगणक प्रशिक्षण घेत आहेत. दुसऱ्या टप्प्यात ३ मे ते ५ मे शंभर तर तिसऱ्या टप्प्यात ६ मे ते ८ मे ६५ असे एकूण २६५ प्रगणक प्रशिक्षण घेणार आहोत सध्या पहिला टप्पा सुरू आहे.

तहसीलदार तथा जामखेड तालुका जनगणना अधिकारी धनंजय बांगर, निवासी नायब तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांनी प्रशिक्षण स्थळी भेट देत आढावा घेतला.

जामखेड ग्रामीण भागातील जनगणना करण्यासाठी 4 क्षेत्रीय प्रशिक्षक आहेत यामध्ये पंचायत समितीचे विस्तार अधिकारी कैलास खैरे, तंत्रस्नेही शिक्षक आशिष निंभोरे, केंद्रप्रमुख पांडुरंग मोहळकर व माजीद शेख हे आहेत.

जनगणना-२०२७ ही दोन टप्प्यांत पूर्ण केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात घरांची यादी व घरगणना करण्यात येणार असून हा टप्पा १ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. यामध्ये १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्वयंगणना सुविधा उपलब्ध राहणार आहे, तर १६ मे ते १४ जून २०२६ दरम्यान प्रगणकांकडून प्रत्यक्ष क्षेत्रीय सर्वेक्षण केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना २०२७ मध्ये पार पडणार आहे.




