जामखेड न्युज – – –
लसीकरणातील गोंधळासंबंधी नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला महापालिकेने नोटीस बजावली आहे. या प्रश्नासंबंधी तीन दिवसांत महापालिकेकडे पुराव्यांसह खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे. महापालिकेतर्फे आरोग्य अधिकाऱ्याने ही नोटीस पाठविली आहे. महापालिकेत शिवसेना-राष्ट्रवादी यांची सत्ता आहे. मात्र, महापालिका प्रशासनाची ही द़डपशाही असून कारभार सुधारण्याऐवजी पत्रकारालाच नोटीस पाठविण्याच्या या तालिबानी वृत्तीचा निषेध करीत असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी व्यक्त केली आहे. पत्रकार संघटनांनीही महापालिकेच्या या कृतीचा निषेध केला आहे. जामखेड तालुका पत्रकार संघाने या कृतीचा जाहीर निषेध केला आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अहमदनगरला करोनासंबंधीच्या उपाययोजनांची आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये लसीकरणासंबंधी सुरू असलेल्या गोंधळासंबंधीचे प्रश्नही होते. मनपाच्या लसीकरण केद्रांवर गोंधळ असून काही ठिकाणी कर्मचारी लस बाहेर विकत असल्यासंबंधी सामनाच्या वार्ताहराने प्रश्न विचारला होता. त्याला पालकमंत्री मुश्रीफ यांनी याची दखल घेतल्याचे सांगून प्रशासनाला गैरप्रकार होत असतील तर चौकशी करण्याच्या सूचना तेथेच दिल्या होत्या. असे प्रश्न पुन्हा पुन्हा येत असल्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालावे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले होते.
पालकमंत्र्यांची पाठ फिरल्यानंतर महापालिकेने वेगळीच भूमिका घेतली. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उलट प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारालाच नोटीस पाठविली आहे. त्यांनी म्हटले आहे, करोनाची साथ नियंत्रणासाठी मार्च २०२० पासून मनपा प्रशासन व आरोग्य कर्मचारी सरकारच्या निर्देशानुसार उपाययोजना व आरोग्य विषयक सर्व सोयो सुविधा सातत्याने देत आहे. जानेवारी २०२१ पासून मनपा आरोग्य कर्मचारी लसीकरण मोहीम राबवित आहेत. आतापर्यंत एकूण १५०६४ कुप्यांद्वारे एकूण १५४०९५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. सरकारकडून लस अल्पप्रमाणात व अनियमीतपणे उपलब्ध होत असल्याने शहरातील नागरिकांना लसबाबत माहिती व्हावी यासाठी मनपा प्रशासनामार्फत लसीकरणासंदर्भात विविध प्रसार माध्यमे व समाज माध्यमांद्वारे दैनंदिन माहिती दिली जाते. तथापि, आपण पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये मनपाच्या लसीकरण केंद्रांमधून लस बाहेर विकली जाते, असा प्रश्न वजा तक्रार केलेली आहे.
ADVERTISEMENT

आपण सदरची बाब महानगरपालिका प्रशासन स्तरावर निदर्शनास आणून न देता पालकमंत्री यांच्या समक्ष विचारणे उचित नाही. ही बाब आरोप वजा असल्याने, करोना साथ नियंत्रणासाठी कार्यरत सर्व कर्मचारी यांचा उत्साह व मनोबल खच्चीकरण करणारी आहे. त्यामुळे आयुक्तांनी याची सखोल चौकशीचे निर्देश दिलेले आहेत. त्याअनुषंनगाने महानगरपालिकेच्या कोणत्या आरोग्य केंद्रामध्ये, कधी व कोणत्या कर्मचा-यांकडून असे प्रकार घडले याबाबतची इत्थंभूत माहिती व पुरावे या कार्यालयाकडे तीन दिवसांमध्ये लेखी सादर करावेत. आपण अहमदनगर शहराचे सुजाण नागरीक आणि अनुभवी व ज्येष्ठ वार्ताहर असल्याने याबाबत सहकार्य करावे, त्यामुळे संबंधीतांवर पुढील प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करणे शक्य होईल, असे नोटीशीत म्हटले आहे.
याचा पत्रकार संघटनांनी निषेध केला आहे. मात्र, शिवसेनेही याची दखल घेतली आहे. शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे म्हणाले, ‘प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला नोटीस पाठविण्यापेक्षा महापालिका प्रशासनाने आपला कारभार सुधारण्याकडे लक्ष दिले पाहजे. अनेक लसीकरण केंद्रासंबंधी तक्रारी आहेत. नागरिक तक्रारी करतात, आम्ही नगरसेवकही तक्रारी करत आहोत. मात्र, त्यांची चौकशी करण्यापेक्षा पत्रकाराला नोटीस पाठवून प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज बंद करणाऱ्या या तालिबानी प्रवृत्तीचा आम्ही निषेध करीत आहोत. शिवसेनेतर्फे याचा पाठपुरावा केला जाईल,’ असेही बोराटे यांनी म्हटले आहे.