जामखेडमध्ये महामार्ग अतिक्रमणावर कारवाईचा इशारा; ८ दिवसांत हटवण्याचे आदेश
जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 548-D वरील अतिक्रमणांविरोधात प्रशासनाने कडक भूमिका घेत संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत. उपविभागीय अभियंता, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, पाथर्डी यांच्या कार्यालयामार्फत ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.
खर्डा चौक ते बीड कॉर्नर दरम्यान महामार्गालगत करण्यात आलेल्या अवैध बांधकामे व अतिक्रमणांवर ही कारवाई केंद्रित आहे. शुक्रवार, दि. २४ एप्रिल २०२६ रोजी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या उपस्थितीत जामखेड पंचायत समितीत महामार्ग विभाग, भूमी अभिलेख, नगर परिषद व महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
यापूर्वी दि. १ व २ एप्रिल २०२६ रोजी संबंधित सर्व विभागांच्या संयुक्त मोजणीत समर्थ हाॅस्पीटल ते बीड रोड काॅर्नर ते खर्डा चौक या भागात महामार्गाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतरच प्रशासनाने नोटिसा देण्याची कारवाई हाती घेतली आहे.
नोटिसनुसार, संबंधित अतिक्रमणधारकांनी ८ दिवसांच्या आत स्वतःहून अतिक्रमण काढून टाकावे, अन्यथा प्रशासनाकडून संयुक्त मोहीम राबवून अतिक्रमण हटवले जाईल. तसेच, त्या कारवाईचा संपूर्ण खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
महामार्गाचे रुंदीकरण व इतर विकासकामे सुरळीत पार पाडण्यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे प्रशासनाने सांगितले असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
चौकट – सर्व अतिक्रमणांवर समान कारवाई हवी!
महामार्गावरील अतिक्रमण हटविण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे; मात्र कारवाई सर्व ठिकाणी समान व निष्पक्ष झाली पाहिजे. दिनांक १व २ एप्रिल रोजी झालेल्या संयुक्त मोजणीत समर्थ हॉस्पिटल ते बीड रोड कॉर्नर परिसरातही महामार्गाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले असून, तेथेही तातडीने कारवाई करावी. — अवधूत पवार (सामाजिक कार्यकर्ते)