जामखेड न्युज—–
गितेवाडी शाळा गुणवत्तेची खाण – उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते
विविध स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांचा शाळेत गुणगौरव कार्यक्रम संपन्न

जामखेड तालुक्यातील जि. प .प्रा. शाळा गितेवाडी ही शाळा गुणवत्तेची खाण असून याच गुणवत्तेच्या जोरावर या शाळेच्या पटात लक्षणीय वाढ झाली आहे. असे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी श्री दादासाहेब गिते यांनी गुणगौरव सोहळ्यात केले.

गितेवाडी शाळेतील मिशन आरंभ व इतर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेतील 41 गुणवंताचा गुणगौरव सोहळा गितेवाडी शाळेत पार पडला. या यावेळी त्यांनी शिक्षक पालक व विद्यार्थी यांचे भरभरुन कौतुक करून अभिनंदन केले.

यावेळी खर्डा बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी अशोक आंधळे, सिताराम गडाचे मठाधिपती ह. भ. प .महालिंग महाराज नगरे, माऊली महाराज नगरे ,ह. भ. प. सांगळे महाराज, खर्डा ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे, महादेव ढगे, आदर्श मुख्याध्यापक अशोक जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश होडशीळ, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष कुंडलिक गिते मुख्याध्यापक चंद्रकांत अरण्ये यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी दादासाहेब गिते यांनी आपल्या मनोगतातून पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे कायम लक्ष देणे गरजेचे गरजेचे आहे. प्रत्येक गावाने एकजुटीने पुढाकार घेऊन शाळेचा विकास करावा. आजची पिढी मोबाईलच्या आहारी गेली असून पालकांनी आपल्या पाल्यांना मोबाईल देऊ नये असा मार्मिक सल्लाही त्यांनी दिला.

भविष्यात गितेवाडी शाळेसाठी आपण शासकीय स्तरावरुन दोन वर्गखोल्या देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. प्रत्येक गावांनी शिक्षकांचा सन्मान केला पाहिजे. मराठी शाळा वाचविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे . असा मौलिक विचार अहिल्यानगर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी श्री दादासाहेब गिते यांनी दिला.




