Home ताज्या बातम्या जामखेडमध्ये शॉर्टसर्किटमुळे वीज वितरण कंपनीच्या आवारातील कचऱ्याला भीषण आग, नगरसेवक हर्षद काळे...

जामखेडमध्ये शॉर्टसर्किटमुळे वीज वितरण कंपनीच्या आवारातील कचऱ्याला भीषण आग, नगरसेवक हर्षद काळे यांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

0
4

जामखेड न्युज—–

जामखेडमध्ये शॉर्टसर्किटमुळे वीज वितरण कंपनीच्या आवारातील कचऱ्याला भीषण आग, नगरसेवक हर्षद काळे यांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

जामखेड शहरातील वीज वितरण कंपनी (MSCB) च्या प्रांगणात साचलेल्या कचऱ्याला शॉर्टसर्किटमुळे अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे, ही घटना गजबजलेल्या शनिवार बाजाराच्या दिवशी घडल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, MSCBच्या परिसरात साचलेला कचरा आणि विद्युत यंत्रणेजवळील शॉर्टसर्किट यामुळे ठिणगी पडून आगीची सुरुवात झाली. सुरुवातीला लहान स्वरूपाची असलेली आग वाऱ्याच्या झोतामुळे झपाट्याने पसरू लागली. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पाहून परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली.

दरम्यान, शनिवार बाजारामुळे मुख्य रस्त्यांवर मोठी गर्दी आणि वाहतुकीची कोंडी झाल्याने अग्निशमन दलाच्या वाहनांना घटनास्थळी पोहोचण्यात अडथळे निर्माण झाले. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली असताना नगरसेवक हर्षद काळे यांनी समयसूचकता दाखवत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

हर्षद काळे यांनी स्वतः पुढाकार घेत परिस्थितीची पाहणी केली आणि तत्काळ आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. नगरपरिषद कर्मचारी गड्डू भाई, MSCB कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक यांच्या मदतीने पाण्याचे फवारे, बादल्या व उपलब्ध साधनांचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. काही वेळाच्या अथक प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आग अधिक पसरली असती तर विज वितरण यंत्रणा तसेच आजूबाजूच्या दुकाने व नागरिकांच्या मालमत्तेला मोठे नुकसान होण्याची शक्यता होती. वेळेत घेतलेल्या निर्णयामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.

घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती. या प्रसंगी नगरसेवक हर्षद काळे यांच्या धाडसी व तत्पर कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या उपस्थितीमुळे परिस्थिती नियंत्रणात आणणे शक्य झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

सदर घटनेमुळे विज वितरण कंपनीच्या प्रांगणात साचलेल्या कचऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!