Wednesday, April 8, 2026
Home ताज्या बातम्या सर्व विभागांनी समन्वय साधून कामे गतीमान करावीत – मुख्य कार्यकारी अधिकारी ...

सर्व विभागांनी समन्वय साधून कामे गतीमान करावीत – मुख्य कार्यकारी अधिकारी जामखेड दौऱ्यात विविध शासकीय योजना, आरोग्य सुविधा, शैक्षणिक प्रगती, जनजीवन कामांची पाहणी

0
2

जामखेड न्युज ——

सर्व विभागांनी समन्वय साधून कामे गतीमान करावीत – मुख्य कार्यकारी अधिकारी

जामखेड दौऱ्यात विविध शासकीय योजना, आरोग्य सुविधा, शैक्षणिक प्रगती, जनजीवन कामांची पाहणी

अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी जामखेड दौऱ्यात तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा, जनजीवन मिशन, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत कामांची पाहणी करत विद्यार्थी, शिक्षक, नागरिक, अधिकारी यांच्याशी संवाद साधला तसेच आढावा बैठक घेत योग्य त्या सूचना दिल्या. तसेच सर्व विभागांनी समन्वय साधून कामे गतीमान करावीत असे आवाहन केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांचा दिनांक 08 एप्रिल 2026 रोजी जामखेड दौरा पार पडला. या दौऱ्यादरम्यान विविध शासकीय योजनांची प्रत्यक्ष पाहणी, आढावा बैठक तसेच स्थानिक नागरिक व विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी शुभम जाधव, आरोग्य अधिकारी डॉ सुनील बोराडे,
जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता विठ्ठल माने, गटशिक्षणाधिकारी प्रदीप चव्हाण सह इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दौऱ्याची सुरुवात प्राथमिक आरोग्य केंद्र, अरणगाव येथून करण्यात आली. येथे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कार्यक्रम, तसेच औषधांचा नियमित व पुरेसा साठा याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. गर्भवती महिलांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा, तपासण्या व उपचारांची गुणवत्ता तपासण्यात आली. तसेच आरोग्य केंद्रात स्वच्छता, रुग्ण नोंदवही, औषध साठा व्यवस्थापन व कर्मचारी उपस्थिती यांची तपासणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सेवा अधिक प्रभावी व नागरिकाभिमुख करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

त्यानंतर अरणगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस भेट देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत माहिती घेण्यात आली. विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास, स्वच्छता, शिस्त व डिजिटल शिक्षणाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षकांशी चर्चा करून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.

याच अनुषंगाने जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेची पाहणी करण्यात आली. पाणीपुरवठ्याची नियमितता, पाईपलाईनची स्थिती, पाण्याची गुणवत्ता व नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांचा आढावा घेऊन कामे वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

ग्रामपंचायत फकराबाद येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत विविध उपक्रमांची पाहणी करण्यात आली. गावामध्ये बसविण्यात आलेल्या 12 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे उद्घाटन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे गावातील सुरक्षा व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. तसेच ग्रामपंचायत व शाळा इमारतींवर बसविण्यात आलेल्या सोलर पॅनलचे उद्घाटन करून अक्षय ऊर्जेचा वापर वाढविण्याबाबत सकारात्मक पाऊल उचलण्यात आले. या उपक्रमांमुळे ऊर्जा बचत व पर्यावरण संरक्षणास हातभार लागणार आहे.

यानंतर ग्रामपंचायत पिंपरखेड येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा आढावा घेण्यात आला. तसेच मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यामध्ये विहीर बांधकाम, फळबाग लागवड, मातोश्री पानंद रस्ता विकास कामे यांचा समावेश होता. यासोबतच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या घरकुल बांधकामांची पाहणी करून लाभार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. कामांची गुणवत्ता, प्रगती व लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांची खात्री करून संबंधित अधिकाऱ्यांना वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

दौऱ्याच्या शेवटी पंचायत समिती, जामखेड येथे सर्व विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. सामान्य प्रशासन विभाग, अर्थ विभाग, घरकुल विभाग, मनरेगा विभाग तसेच इतर विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेण्यात आला. विविध योजनांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी, निधीचा वापर, प्रलंबित कामे यावर चर्चा करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सर्व विभागांनी समन्वय साधून कामे गतीमान करण्याचे निर्देश देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!