Tuesday, April 7, 2026
Home ताज्या बातम्या माजी नगरसेवक संदीप गायकवाड यांचा उच्च न्यायालयात जामीन मंजूर नर्तिकेच्या आत्महत्या...

माजी नगरसेवक संदीप गायकवाड यांचा उच्च न्यायालयात जामीन मंजूर नर्तिकेच्या आत्महत्या प्रकरणी होता आरोप

0
2

जामखेड न्युज—–

माजी नगरसेवक संदीप गायकवाड यांचा उच्च न्यायालयात जामीन मंजूर

नर्तिकेच्या आत्महत्या प्रकरणी होता आरोप

चार महिन्यापुर्वी जामखेड येथील बहुचर्चित आत्महत्येच्या प्रकरणात आरोपी संदीप सुरेश गायकवाड याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती शैलेश पी. ब्रह्मे यांनी ६ एप्रिल २०२६ रोजी हा आदेश दिला.

सदर प्रकरणात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ६४८/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित नर्तिकेने ४ डिसेंबर २०२५ रोजी साई लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणात आरोपीने लग्नासाठी दबाव टाकत मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला होता.

सुनावणीदरम्यान आरोपीच्या वतीने अँड. सत्यजित बाळासाहेब पवार यांनी युक्तिवाद करताना नमूद केले की, साक्षीदारांच्या जबाबांमध्ये कोणताही ठोस छळ अथवा सातत्यपूर्ण त्रास दिसून येत नाही. तसेच, सीसीटीव्ही फुटेजमधूनही आरोपीकडून कोणतीही प्रत्यक्ष आक्षेपार्ह कृती झाल्याचे आढळत नाही. न्यायालयानेही उपलब्ध पुराव्यांचा विचार करून आत्महत्येस प्रवृत्त करण्याइतका ठोस आणि गंभीर छळ सिद्ध होत नसल्याचे निरीक्षण नोंदवले.

न्यायालयाने नमूद केले की, साक्षीदारांच्या जबाबांमध्ये छळाचे ठोस तपशील नाहीत तसेच आरोपीच्या कथित कृत्यांमुळे आत्महत्येचा थेट संबंध जोडणारा स्वतंत्र पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे आरोपीला जामीन देणे योग्य असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

दरम्यान, या प्रकरणाला राजकीय पार्श्वभूमीही लाभली होती. आरोपी संदीप गायकवाड हा जामखेडमधील माजी नगरसेवक असून त्याचे विविध राजकीय पक्षांशी संबंध राहिले आहेत. २०१६ च्या नगरपरिषद निवडणुकीत तो राष्ट्रवादीकडून निवडून आला होता. त्यानंतरच्या काळात त्याने विविध राजकीय घडामोडींमध्ये सहभाग घेतला असून २०१९ च्या निवडणुकीत तो आमदार रोहित पवार यांच्या संपर्कात होता, तसेच पुढे राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचेही समोर आले आहे.

तसेच, या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करत प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती, ज्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग चढला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!